Solapur News : वादळी वाऱ्यामुळे कोसळला मंदिराचा कळस, ग्रामस्थांमध्ये चिंता
01:10 PM Jun 06, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
Advertisement
ईट : ईट परिसरातील डोकेवाडी गावात गुरुवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले. यामध्ये गावातील श्री वेताळ स्वामी मंदिरावरील कळस जोरदार वाऱ्याच्या तडाख्यामुळे कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. गुरुवारी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार वारे वाहू लागले. त्यानंतर पावसाने हजेरी लावली.
वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की मंदिराच्या शिखरावरील कळसाचा काही भाग तुटून खाली पडला. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मंदिराकडे धाव घेत पाहणी केली. स्थानिक नागरिकांच्या मते, वाऱ्याचा वेग मोठा असल्याने अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या असून काही ठिकाणी वीजवाहिन्यांनाही धोका निर्माण झाला आहे.
मंदिराचा कळस पडल्याने भाविकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, हवामानातील बदल लक्षात घेता नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, तसेच वादळी वारे आणि पावसाच्या काळात जुन्या इमारती, झाडे व वीजवाहिन्यांपासून सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Advertisement
Advertisement