देह देवाचे मंदिर
माणूस स्वत:च्या शरीरात फार कमी वेळापुरता राहतो. त्याचे लक्ष विचार, कल्पना, भावना यात गुंतलेले असते. विचार आणि मन यांची गुंतवणूक जेवढी जास्त तेवढा तो शरीराबाहेर असतो. जी माणसे संपूर्णपणे आपल्या शरीरात असतात ती स्वस्थ आणि निरोगी असतात. कारण शरीर हे आत्मभानाचे वाहक आहे. मोठ्या माणसांपेक्षा लहान मुले अधिक प्रसन्न, आनंदी असतात.कारण ती शरीराशी पूर्णत: जोडलेली असतात.
माणूस नेहमी वेगवेगळ्या वाहनांनी प्रवास करीत असतो. लांबचा प्रवास करून इच्छित स्थळी पोहोचल्यावर खरंच का माणसाला चालकाचे स्मरण होते? कुणी आणले इथपर्यंत? त्याचे नाव-गाव काय? विमानात बसल्यावर पायलटचे नाव सांगतात; परंतु त्यांचा चेहरा कधी बघायला मिळत नाही. पैसे भरून काढलेले तिकीट तेवढे महत्त्वाचे वाटते. इतर गोष्टी लक्षात ठेवाव्यात असे वाटत नाही.
जीवनप्रवासाचेही तसेच नाही का? जन्माला आल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत या देहप्रवासाचा चालक आहे तरी कोण? याचे भान यावे असा क्षणदेखील आयुष्यात येत नाही हे मनुष्याचे दुर्दैव आहे. विद्वान म्हणतात, देहप्रवासाचे भान येण्यासाठी खरेच तुम्ही शरीरात असता का? शरीरात असणारे अदृश्य मन माणसाला घेऊन भटकत असते.
माणूस स्वत:च्या शरीरात फार कमी वेळापुरता राहतो. त्याचे लक्ष विचार, कल्पना, भावना यात गुंतलेले असते. विचार आणि मन यांची गुंतवणूक जेवढी जास्त तेवढा तो शरीराबाहेर असतो. जी माणसे संपूर्णपणे आपल्या शरीरात असतात ती स्वस्थ आणि निरोगी असतात. कारण शरीर हे आत्मभानाचे वाहक आहे. मोठ्या माणसांपेक्षा लहान मुले अधिक प्रसन्न, आनंदी असतात. कारण ती शरीराशी पूर्णत: जोडलेली असतात. भूमी आणि प्राण यांच्याशी संलग्न असलेली व्यक्ती फक्त अंतर्यात्रेच्या प्रवासाला निघते आणि अंतर्यात्रेच्या प्रवासात कुठेतरी, कधीतरी, केव्हातरी देहयात्रेचा चालक दिसला नाही तरी त्याचा शोध मात्र नक्कीच लागतो.
यजुर्वेदामध्ये एक दृष्टांत आहे. त्यात असे म्हटले आहे की, शरीर म्हणजे सात ऋषींचा आश्रम आहे. नाक, जीभ, डोळे त्वचा, कान, वाणी आणि मन हे सात ऋषी आहेत. हे सात ऋषी आश्रमाचे संरक्षण डोळ्यात तेल घालून, अजिबात दुर्लक्ष न करता करीत आहेत. शरीररुपी आश्रमात तपश्चर्या करणाऱ्या या ऋषींना तपस्वी, योगी, मुनी व्हायचे असते. परंतु संयम नसल्यामुळे मनुष्यत्व त्यांना राक्षस कसे करता येईल याच्या मागे लागते. खरे म्हणजे ही इंद्रिये शरीररूपी यज्ञात श्रेष्ठ आणि मार्गदर्शक ऋषी असतात. त्यांचे या शरीरात शंभर वर्षांचे यज्ञसत्र सुरू असते. परंतु रोगजंतुरूपी राक्षस या पवित्र यज्ञाचा नाश करण्याचा सतत प्रयत्न करीत असतात.
विघ्नकर्ते राक्षस वाईट विचार उत्पन्न करतात आणि शंभर वर्षांपूर्वीच या यज्ञाचा नाश करून टाकतात. या यज्ञाच्या संरक्षणार्थ दोन वीर कुमार प्राण आणि अपान असतात. हे निद्रा घेत नाहीत. भोग भोगीत नाहीत आणि विश्रांती सुद्धा घेत नाहीत. राक्षसांचा नाश करीत शरीररूपी यज्ञक्षेत्राचे संरक्षण करणे हेच त्यांचे प्रमुख कार्य असते. ज्यावेळी हे ऋषी झोपतात म्हणजे इंद्रिये जेव्हा अंतर्मुख होतात तेव्हा माणसाला स्वस्वरूपाचे ज्ञान होते.
ओशो रजनीश यांनी एके ठिकाणी म्हटले आहे की, पाश्चिमात्य देशांत विज्ञानाने आपली तत्त्वांची धारणा प्रयोगशाळेतून निर्माण केली आणि भारतामध्ये पंचमहाभूतांची धारणा ही प्रयोगशाळेतून नव्हे तर आंतरिक अनुभूतीतून निर्माण झाली. जे लोक अंतर्यामीच्या जीवनात खोल उतरतील त्यांना एका तत्त्वाचा साक्षात्कार होईल आणि ते तत्त्व म्हणजे अग्नितत्त्व. आपल्या जीवनाचे समग्र रूप म्हणजे अग्नी. विद्युत हे अग्नीचेच एक रूप. आपले आजचे जीवन संगणक अर्थात कॉम्प्युटरने व्यापले आहे. माणसाच्या बुद्धीने निर्माण केलेला संगणक विद्युतऊर्जेवर चालतो. आपल्या शरीराच्या आत एक नैसर्गिक संगणक आहे. त्याचे काम देखील अग्नीवर चालले आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले आहे की-
‘अगा, देहीचा अग्नी जरी गेला ।
तरी देह नव्हे चिखलु ओला?’
या देहात असलेल्या अग्नीमुळे तर जीवनऊर्जा मिळते आहे. मेंदू नावाचा विज्ञानाला अनाकलनीय संगणक सतत अवाढव्य काम करतो आहे. कोट्यावधी पेशी आपल्या शरीरात काम करीत आहेत.
अमृतज्ञानेश्वरीमध्ये न्या. राम केशव रानडे म्हणतात की, ‘माणसाच्या अंतरंगात सुंदर मंदिर आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात भगवंत आहे. मंदिराला पायऱ्या आहेत. माणूस एकेक पायरी चढला तरच ती पायरी होते. नाहीतर तो नुसता दगड असतो. नुसताच विचार न करता एक एक पायरी चढू या. एकेक पायरी चढू लागलो म्हणजे भगवंताच्या मंदिराचा दरवाजा लागतो. हा दरवाजा उघडत नाही म्हणून आपण रडू लागतो. हे अश्रू फार पवित्र असतात. लोक म्हणतात की डोळ्यात अश्रू येणे ही अशुभ गोष्ट आहे. अश्रूअश्रूंत फरक आहे. आता जिंकायला जग राहिले नाही म्हणून सिकंदर रडला. त्या अश्रूंमध्ये पावित्र्य नाही, पण देवाच्या मंदिराचे दरवाजे उघडत नाहीत म्हणून जेव्हा आपल्या डोळ्यांत अश्रू येतात तेव्हा त्या पवित्र अश्रूंसमोर हिरेमाणकांच्या राशी मातीमोलाच्या असतात.’ मानवी देहात राहणाऱ्या या ‘मी’ चे दर्शन होण्यासाठी देहाला चिकटून असलेला मानवी ‘मी’ अर्थात अहंकार सुटायला हवा ना? जीवनप्रवासात या ‘मी’ ची साथ सुटल्याशिवाय तो ‘मी’ भेटणार कसा? दिसणार तरी कसा?
- स्नेहा शिनखेडे