संभलच्या मुस्लीमबहुल क्षेत्रात मिळाले मंदिर
पोलिसांनी टाळे तोडून उघडले द्वार
वृत्तसंस्था/ संभल
उत्तरप्रदेशच्या संभलमध्ये मुस्लीम भागात 46 वर्षे बंद राहिलेल्या मंदिराचा शोध लागल्याच्या पार्श्वभूमीवर आणखी एक मंदिर दिसून आले आहे. अतिक्रमण हटविताना घनदाट वस्तीदरम्यान पोलिसांना हे मंदिर दिसून आले. मंदिराची साफसफाई सुरू करण्यात आली आहे. हे मंदिर हयातनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सरायतरीने येथे आढळून आले आहे. तर पूर्वी मिळालेले मंदिर हे संभलच्या खग्गू सराय भागात होते.
सरायतरीन पूर्णपणे मुस्लीमबहुल आहे. परंतु येथे कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण आढळून आलेले नाही. मंदिराचा दरवाजा उघडण्यात आला असता हनुमान आणि राधाकृष्णाची सुंदर मूर्ती दिसून आली आहे.
संभल येथील हिंसेनंतर समाजकंटकांच्या विरोधात शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. यादरम्यान वीजचोरीचा प्रकार निदर्शनास आला होता. वीज विभागाचे कर्मचारी तेथे तपासणीसाठी गेले असता समाजकंटकांकडून त्यांना धमकाविले जात होते. परंतु आता पोलिसांनी संरक्षण दिल्याने प्रशासनाने अवैध अतिक्रमण आणि वीजचोरीच्या विरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे.
या मोहिमेदरम्यान मशिदी आणि घरांची तपासणी करण्यात आली असता वीजचोरीचे खुलासे झाले. परंतु याचदरम्यान शनिवारी सकाळी पोलिसांना दीपा राय भागात एक मंदिर दिसून आले. 46 वर्षांपासून बंद राहिलेले हे मंदिर सप खासदार जियाउर्ररहमान बर्क यांच्या निवासस्थानापासून केवळ 200 मीटर अंतरावर होते. या मंदिरात भगवान हनुमान यांची मूर्ती आणि शिवलिंग तसेच नंदीची मूर्ती आढळून आली आहे.