निपाणीसह परिसरात 16 अंशपर्यंत तापमान
बोचरी थंडी वाजली, शेकोट्या पेटू लागल्या, तंबाखूला पोषक वातावरण
निपाणी : निपाणीसह परिसरात प्रत्येक ऋतूचा चांगला अनुभव मिळतो. तब्बल एक महिना उशिराने का असेना थंडी पडू लागली आहे. गेल्या चार दिवसात वातावरणात चांगलाच बदल झाल्याचे दिसत आहे. यातून थंडीचे प्रमाण वाढताना बोचऱ्या थंडीचा अनुभव सर्वांनाच मिळत आहे. हे वातावरण परिसरातील प्रमुख पीक असणाऱ्या तंबाखूच्या वाढीसाठी आणि भरणीसाठी पोषक मानले जात असून शेतकरी वर्गात स्वच्छ वातावरणातून समाधान व्यक्त होत आहे. यंदा मान्सूनचे आगमन उशिराने होऊन देखील पाऊस होईल अशी अपेक्षा कायम राहिली. महिनाभराच्या उशिराने काही प्रमाणात पाऊस झाला पण तो पाऊस भूजल पातळी वाढण्यासाठी मात्र पुरेसा ठरला नाही. यामुळे परिसरात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. ऊस उत्पादनावर मोठा परिणाम होताना उत्पादनात घट आली. सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू झाला आहे. लगबगीने तोडणी कामे सुरू आहेत. ऊस पळवापळवीची स्पर्धाच जणू काही साखर कारखान्यांमध्ये सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. पण सर्वच साखर कारखान्यांसमोर तोडणी यंत्रणेचे आव्हान मात्र कायम आहे. सध्या पडणाऱ्या थंडीमुळे तोडणी हंगामावर काहीसा परिणाम होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
तंबाखू उत्पादन क्षेत्रात वाढ
निपाणीसह परिसरात तंबाखू पिकाचे उत्पादन पारंपारिकरित्या घेतले जाते. गेल्या काही वर्षात तंबाखू पिकाच्या क्षेत्राला मागे टाकत ऊस पिकाने प्रथम क्रमांकावर येण्याचा मान पटकावला आहे. यंदा तंबाखू उत्पादन क्षेत्रात वाढ झाली आहे. पावसाविना खरीप हंगाम अपयशी ठरल्याने हा परिणाम झाला आहे. रब्बी उत्पादन क्षेत्रात देखील वाढ झाली आहे. सध्या शिवारात ऊसतोडणी सुरू असली तरी अधिकतर शेतकरी तंबाखू आणि रब्बी उत्पादन चांगल्या पद्धतीने कसे येईल याचाच प्रयत्न करू लागले आहेत. पिकांना पाणी देण्याचे काम आवश्यकतेनुसार सुरू आहे. अशावेळी थंडी वाढल्याने तंबाखू पिकाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. रब्बी हंगामातील पीक म्हणून घेतल्या जाणाऱ्या ज्वारी, हरभरा, गहू या पिकांच्या वाढीसाठी देखील पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या चार दिवसात थंडीच्या प्रमाणात वाढ होत आहे. 16 अंश ते 20 अंशपर्यंत तापमान खाली आल्यामुळे बोचऱ्या थंडीचा अनुभव मिळू लागला आहे. माळमुरड शिवारात असणाऱ्या तंबाखूच्या कापणीला सुरुवात झाली आहे. बोचरी थंडी पडू लागल्याने सकाळच्या वेळी होणाऱ्या शेती कामांमध्ये व्यत्यय येऊ लागला आहे. शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. बोचऱ्या थंडीला प्रतिबंध करण्यासाठी हा प्रयत्न सुरू झाला आहे. चाऱ्यासाठी ऊसतोडी कामाकरिता जाणाऱ्या पशूपालकांना देखील त्रास होऊ लागल्याने ऊसतोडणी शिवारातील गर्दी कमी होऊ लागली आहे. येणाऱ्या काही दिवसात अधिकची थंडी वाढणार असा अंदाज वर्तवला जात असून हे वातावरण शेतीपिकांच्या वाढीसाठी अधिक पोषक ठरेल, असे समाधान व्यक्त होत आहे.
बेळगाव शहर परिसरात हुडहुडी वाढली : वातावरणात बदल : सर्वत्र गारठा
मागील चार दिवसांपासून वातावरणात बदल जाणवू लागला आहे. थंडीची तीव्रता वाढत असल्याने पहाटे आणि रात्री हुडहुडी भरू लागली आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यात म्हणावी तशी थंडी जाणवली नाही. मात्र डिसेंबर पंधरवड्यानंतर आता थंडीचा कडाका वाढला आहे. पहाटे आणि रात्री थंडीची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे. त्यामुळे उबदार कपड्यांना पसंती मिळू लागली आहे. विशेषत: ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. रविवारी पहाटेपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. कमाल तापमान खाली आल्याने दिवसभर वातावरणात गारठा जाणवू लागला होता. थंडीपासून सुरक्षिततेसाठी कानटोपी, हातमोजे, मफलर, जॉकेट आणि स्वेटरचा वापर वाढला आहे. पहाटे बाहेर पडणाऱ्या आणि मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांना थंडीची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे. नोव्हेंबर महिन्यात सातत्याने वातावरणात बदल झाला होता. धुके, ऊन, थंडी अशा संमिश्र वातावरणाचा अनुभव आला होता. डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात म्हणावी तशी थंडी जाणवली नाही. मात्र, आता थंडीची तीव्रता हळूहळू वाढू लागली आहे. त्यामुळे आजारदेखील बळावू लागले आहेत. थंडी, ताप, खोकलासारख्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. ग्रामीण भागात सुगी हंगाम जोमाने सुरू झाला आहे. त्यामुळे पहाटे शेताकडे जाणाऱ्या नागरिकांना थंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.