For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजस्थानच्या 19 शहरांमध्ये तापमान 45 अंशाच्या पार

07:00 AM May 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
राजस्थानच्या 19 शहरांमध्ये तापमान 45 अंशाच्या पार
Advertisement

बाडमेर 48 अंश तापमानासह देशात सर्वात उष्ण ठिकाण : उत्तरप्रदेश-पंजाबमध्ये उष्मालाटेचा रेड अलर्ट

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

हवामान विभागाने राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तरप्रदेशात 4 दिवसांसाठी उष्मालाटेचा रेड अलर्ट जारी केला आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली आणि महाराष्ट्रातही उष्मालाटेचा इशारा देण्यात आला आहे. देशातील सर्वात उष्ण शहर म्हणून राजस्थानच्या बाडमेरची नोंद झाली आहे. तेथे कमाल तापमान 48 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले आहे. राजस्थानात आगामी दिवसांमध्ये पारा 50 अंशावर पोहोचण्याची शक्यता आहे. राज्यातील 19 शहरांमध्ये तापमान 45 अंशाच्या पार पोहोचले होते. तर उष्णतेमुळे राजस्थानच्या बालोतरा जिल्ह्यातील एका निर्माणाधीन रिफायनरीत काम करत असलेल्या मजुराचा मृत्यू झाला आहे. जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश वगळता उष्मालाटेचा इशारा देण्यात आलेल्या राज्यांच्या 50 हून अधिक शहरांमध्ये सलग आठव्या दिवशी तापमान 43 अंशांपेक्षा अधिक नोंद झाले आहे. राजस्थान, गुजरात, हरियाणा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशात आगामी 5 दिवसांपर्यंत कमाल तापमान 44 अंशाहून अधिक राहण्याची शक्यता आहे. तर पंजाब, दिल्ली, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणात कमाल तापमान 40-44 अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर दक्षिण भारतात उष्णतेपासून दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर ईशान्येतील राज्यांमध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Advertisement

24 मे : रात्री अधिक उष्णतेचा अनुमान

उत्तरप्रदेश आणि राजस्थानात रात्री अधिक उष्णता राहण्याचा अनुमान आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये उष्मालाटेचा इशारा देण्यात आला आहे. केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये सागरी किनाऱ्यांनजीक असलेल्या शहरांमध्ये 40 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वारे वाहू शकतात. पश्चिम बंगाल, ओडिशा, अंदमान आणि निकोबार, तामिळनाडू, पु•gचेरी, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

25 मे : हिमाचलमध्ये उष्मालाट शक्य

राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तरप्रदेशात उष्ण वारे वाहण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशच्या विविध हिस्स्यांमध्ये उष्मालाटेची स्थिती राहू शकते.

26 मे : ईशान्येत जोरदार पाऊस

अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, आसाम आणि मेघालयात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा, जम्मू, हिमाचल प्रदेश, गुजरात, महाराष्ट्रमध्ये उष्मालाटेला सामोरे जावे लागू शकते.

बांगलादेश-थायलंडमध्ये उष्मालाटेचे 30 बळी

भारत, बांगलादेश, पाकिस्तान, थायलंड, व्हिएतनाम, माली आणि लीबियात तापमान 45 अंशापेक्षा अधिक राहिले आहे. अमेरिकेच्या नॅशनल ओसियानिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनच्या अहवालानुसार अनेक देशांमध्ये रात्रीच्या वेळी देखील उष्मालाटेची स्थिती आहे. दक्षिण आशियात उष्मालाटेची शक्यता 45 पटीने वाढली आहे. पश्चिम आशियात हे प्रमाण 5 पट वाढले आहे. बुधवारी भारताच्या 9 शहरांमध्ये तापमान 40 अंशापेक्षा अधिक राहिले आहे. पाकिस्तानात तापमान वाढल्याने शाळा 31 मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णालयांना हाय अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. बांगलादेश तसेच थायलंडमध्ये उष्मालाटेमुळे प्रत्येकी 30 जणांचा मृत्यू झाला आहे. म्यानमारमध्ये तीव्र उष्णतेमुळे प्रतिदिन 40 जणांना जीव गमवावा लागत आहे. तेथील तापमान 48.2 अंशावर पोहोचले आहे.

Advertisement
Tags :

.