कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Tembhu Canal Burst: ऐन उन्हाळ्यात पाणीबाणी, टेंभूचा डावा कालवा फुटल्याने शेतकरी चिंतेत

12:24 PM May 05, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

यंत्रणेशिवाय टेंभूच्या पाण्याची पळवापळवी, परस्पर व्हॉल्व फिरविण्याचा प्रकार चव्हाट्यावर आला

Advertisement

सांगली (आटपाडी) : आटपाडी तालुक्यातील टेंभू योजनेचा डावा कालवा अज्ञात व्यक्तीने स्टॉप व्हॉल्व्ह दाबल्याने पाण्याचा फुगवटा झाल्याने फुटला. दिघंची वितरिकेवरील सदरचा कालवा फुटल्याने ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. याप्रकारामुळे यंत्रणेशिवाय टेंभूच्या पाण्याची पळवापळवी आणि परस्पर व्हॉल्व फिरविण्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.

Advertisement

सध्या टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाचे उन्हाळी आवर्तन सुरू आहे. टेंभूच्या ‘टप्पा क्रमांक 3 अ’मधून लघु पाझर तलाव घाणंदकडे येणाऱ्या मुख्य कालव्यामधुन घरनिकी येथुन डावा कालवा सुरू होतो. यावरून आटपाडी तालुक्यासह काही प्रमाणात सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याच्या काही भागाला पाणी जाते. आटपाडी तालुक्यातील डावा कालव्यावरील उन्हाळी आवर्तन 1 एप्रिलपासुन सुरू झाले आहे.

यावरील दिघंची वितरिकेवरून दिघंची, पळसखेल, आवळाई, निंबवडे, विठलापूर, माण तालुक्यातील कापूसवाडी, शेणवडी, कोरेवाडी गावांना मागणीनुसार पाणीपुरवठ्याचे नियोजन पाटबंधारेकडून सुरू आहे. परंतु आटपाडी तालुक्यातील पाणीपुरवठ्याबाबत तीन-तेरा वाजल्याचे चित्र आहे. पाणी नियोजनासाठी संबंधित बंदिस्त पाईपलाईनच्या ठेकेदारांनी खासगी व्यक्तींची नेमणूक केली आहे. अनेक भागात हिच मंडळी पाण्याचे मक्तेदार झाल्याचे चित्र आहे.

पाहिजे त्याप्रमाणे पाणी अडविणे, सोडणे, एकाचवेळी अनेक भागात पाणी सोडून अपुऱ्या क्षमतेने पाणीपुरवठा करण्याचे उद्योग सुरू आहेत. एकीकडे पाण्याबाबतचा खेळखंडोबा अधिक झाल्याची वस्तुस्थिती आणि दुसरीकडे उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे पाण्याची गरज असे चित्र आहे. टेंभुच्या पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या दिघंचीसह डाव्या कालव्यावरील आणि वितरिकेवरील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पाण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागते.

कालव्यावरील दिघंची वितरिकेवरील पाण्याचा विसर्ग नियंत्रित करण्यासाठी असलेला व्हॉल्व्ह अज्ञात व्यक्तींनी फिरवुन प्रवाह बंद केला. परिणामी आटपाडी डाव्या कालव्यातील पाणी पुढे सरकणे बंद होऊन कालव्यात पाण्याचा मोठा फुगवटा तयार झाला. त्यामुळे हा कालवा पारेकरवाडी ते झरे दरम्यान फुटला. दिघंचीकडील पाण्याचा व्हॉल्व बंद झाल्याने कालव्यातील पाण्याचा दाब वाढला. परिणामी तब्बल 20 मीटर रूंद व 15 मीटर जाडीने डावा कालवा फुटला.

त्यासोबत कालव्यातील सिमेंट काँक्रिटचे अस्तरीकरणही वाहून गेले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पाटबंधारे विभागाने तत्काळ डाव्या कालव्यातील पाण्याचा विसर्ग बंद केला. कालवा फुटल्याने मागील चार दिवसांपासून दिघंची वितरिकेवरील टेंभुचे पाणी ठप्प झाले. पाण्याची मागणी वाढत असताना अज्ञाताने व्हॉल्व फिरवुन आणलेला अडथळा मोठ्या नुकसानीस कारणीभूत ठरला आहे. फुटलेल्या कालव्याचे अंदाजे 30 लाखाहुन अधिकचे नुकसान झाले.

सिंचनापासुन सुमारे 1500 हेक्टर पेक्षाही अधिकचे क्षेत्र वंचित राहुन शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. याप्रकरणी पाटबंधारे विभागाने आटपाडी पोलिसांना पत्र देऊन कारवाईची मागणी केली आहे. याबाबत पाटबंधारेचे आटपाडी शाखेचे अधिकारी महेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता यांत्रिकी विभागाकडून युद्धपातळीवर कालवा दुरूस्तीचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच हे काम पूर्ण होऊन लोकांच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या हालचाली गतिमान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

व्हॉल्व्हला तत्काळ लॉक करा

"टेंभू योजनेच्या पाण्यासाठी लोक टाहो फोडत आहेत. आमदार सुहास बाबर, जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील हे अधिकाऱ्यांसह सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु टेंभूच्या बंदिस्त पाईपलाईनचे पाणी नियंत्रणाचे व्हॉल्व्ह उघड्यावरच आहेत. त्यामुळे कोणीही गैर उद्योग करून परस्पर पाणी बंद किंवा चालू करत आहेत. सदरचे व्हॉल्व्ह सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना तत्काळ लॉक करावे. तरच पाणीपुरवठा सुरळीत होईल."

Advertisement
Tags :
@sanglinews#aatpadi#Summernews#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaTembhu Canal Burst
Next Article