तेलगू-टायटन्स-बेंगळूर बुल्स सलामीची लढत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
18 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या 11 व्या प्रो लीग कबड्डी स्पर्धेत तेलगु टायटन्स आणि बेंगळूर बुल्स यांच्यात सलामीचा सामना हैद्राबादमध्ये खेळविला जाणार आहे.
या सलामीच्या सामन्यात यजमान तेलगु टायटन्सला स्थानिक शौकिनांचे प्रोत्साहन अधिक लाभेल. कारण हा सामना घरच्या मैदानावर खेळविला जात आहे. दर्जेदार रायडर पवन सेरावत आणि प्रदीप नरवाल या दोन कबड्डीपटूंमध्ये ही खरी लढत होईल. प्रदीप नरवालने बेंगळूर बुल्समध्ये पुनरागमन केले आहे. या स्पर्धेतील दुसरा सामना यु. मुंबा आणि दबंग दिल्ली यांच्यात होणार आहे. यु. मुंबा संघातील सुनीलकुमार हा या स्पर्धेतील सर्वात महागडा कबड्डीपटू ठरला आहे. 11 व्या प्रो कबड्डी लीग हंगामासाठी आयोजित केलेल्या कबड्डीपटूंच्या लिलावामध्ये यु. मुंबाने सुनीलकुमारला 1.015 कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केले. प्रो कबड्डी लीगच्या इतिहासामध्ये सुनीलकुमार हा सर्वात महागडा कबड्डीपटू म्हणून ओळखला जात आहे. दबंग दिल्लीची भिस्त प्रामुख्याने नवीन कुमारवर राहिल.
प्रो कबड्डी लीगच्या वेळापत्रकानुसार आता 2024 ची ही स्पर्धा तीन शहरांमध्ये घेतली जाणार आहे. हैद्राबादच्या गच्चीबोली इनडोअर स्टेडियममध्ये सदर स्पर्धा 18 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान आयोजित केली आहे. या स्पर्धेतील दुसरा टप्पा 10 नोव्हेंबरला सुरू होणार असून तो 1 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेतील तिसरा टप्पा पुण्याच्या बालेवाडी बॅडमिंटन स्टेडियममध्ये 3 ते 24 डिसेंबरदरम्यान खेळविला जाईल. 11 व्या प्रो कबड्डी लीग हंगामासाठी मुंबईत 15 आणि 16 ऑगस्ट रोजी कब•ाrपटूंच्या लिलावाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या लिलावामध्ये 8 कबड्डीपटूंवर 1 कोटींपेक्षा अधिक रुपयांची बोली लावण्यात आली असून हा एक विक्रमच आहे. तामिळ थलैवासने सचिनला 2.15 कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केले आहे. कबड्डीपटूंच्या लिलावामध्ये एकूण 118 कबड्डीपटूंचा सहवास होता. मोहम्मद अमानला पुणेरी पल्टनने 16.2 लाख रुपयांच्या बोलीवर खरेदी केले. तर यु. मुंबाने स्टुवर्ट सिंगला 14.2 लाख रुपयांच्या बोलीवर खरेदी केले.