For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्रोत सांगा किंवा तुरुंगात जा

06:16 AM Apr 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्रोत सांगा किंवा तुरुंगात जा
Advertisement

पत्रकारांवर भडकले डोनाल्ड ट्रम्प

Advertisement

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधून एका अमेरिकन अधिकाऱ्याला सुरक्षित परत आणण्याच्या अभियानासंबंधी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यादरम्यान त्यांनी एक चकित करणारा दावा करत अमेरिकेच्या सरकारमध्येच ‘भेदी’ असल्याचा संशय व्यक्त केला. हा भेदी माहिती उघड करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सरकारमधील ‘भेदी’चा शोध

Advertisement

आमचे प्रशासन ही गुप्त माहिती उघड करणाऱ्या इसमाचा शोध घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. या अज्ञात इसमाने अत्यंत संवेदनशील अमेरिकन बचाव अभियान संकटात आणले तसेच संबंाित वेपन्स सिस्टीम ऑफिसरचा जीवही जोखिमीत आणला होता, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. इराणमध्ये अमेरिकेचे एफ-15ई विमान पाडविण्यात आल्यावर अमेरिकेच्या अधिकाऱ्याला शत्रूच्या भूभागातून वाचविण्यात आले होते.

प्रशासनात एखादा ‘मोल’ आहे, जो गोपनीय माहिती प्रसारमाध्यमांना पुरवत आहे. आतापर्यंत या ‘मोल’ची ओळख पटलेली नाही. तपास सुरू असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट पेल. लीक बहुधा पेंटागॉन, गुप्तचर यंत्रणा किंवा एखाद्या उच्चाधिकाऱ्याकडून झाले असावे असा अनुमानही व्यक्त केला जातोय. ही घटना ट्रम्प प्रशासन आणि माध्यमांदरम्यान दीर्घकाळापासून सुरू असलेल्या संघर्षाचा नवा अध्याय आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी अनेक वृत्तसंघटनांवर खटले भरले आहेत. काही प्रकरणांमध्ये माध्यम संस्थांनी तडजोड करत लाखो-कोट्यावधी डॉलर्सची भरपाई ट्रम्प यांना दिली आहे.

पत्रकाराला तुरुंगात पाठविण्याचा इशारा

अमेरिकेचे सैन्य स्वत:च्या बेपत्ता वायुदल अधिकाऱ्याचा शोध घेत असल्याचे वृत्त सर्वप्रथम छापणाऱ्या पत्रकारावर कायदेशीर कारवाई अन् तुरुंगात पाठविण्यात येणार असल्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. ज्या पत्रकाराने हे वृत्त प्रकाशित केले, त्याने जर स्वत:च्या स्रोताचे नाव सांगितले नाही, तर तो तुरुंगात जाईल आणि त्याची शिक्षा कमी नसेल अशी टिप्पणी ट्रम्प यांनी केली आहे.

ट्रम्प यांनी यावेळी कुठलाही पत्रकार किंवा वृत्तसंघटनेचे नाव घेतले नाही, परंतु अत्याधिक गोपनीय माहिती उघड झाल्याने इराणचे सैन्य सतर्क झाले होते. तसेच त्याला अमेरिकेचा एक वैमानिक वाचविण्यात आल्यावर दुसरा वैमानिक स्वत:च्या भूभागात असल्याचे इराणला कळले होते असे ट्रम्प यांनी निदर्शनास आणून दिले. द न्यूयॉर्क टाईम्स, फॉक्स न्यूज आणि एक्सिओस या प्रमुख माध्यम संस्थांनी सर्वप्रथम या घटनेचे वृत्तांकन केले होते.

बचाव अभियानाचे व्यापक स्वरुप

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी शत्रूच्या सीमेतून स्वत:च्या अधिकाऱ्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी राबविण्यात आलेल्या अभियानाच्या विशाल स्वरुपाचे वर्णनही केले. या अभियानात एकूण 155 विमानांच्या ताफ्याचा वापर करण्यात आला होता.

अभियानात सामील विमाने..

4 बॉम्बवर्षक

64 लढाऊ विमाने

48 रिफ्यूलिंग टँकर (आकाशात इंधन भरणारी विमाने)

13 बचाव विमाने

माहिती लीक झाल्याने नाराज

-ट्रम्प यांनी एक पत्रकार आणि मीडिया कंपनीला माहिती लीक केल्याप्रकरणी कारवाईची धमकी दिली.

-प्रशासनातील एखाद्या इसमाने माहिती उघड केल्याचा संशय. ‘मोल’चा शोध घेतला जात असल्याचे वक्तव्य.

-राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव माध्यम कंपनीला स्रोत सांगावा लागणार, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार.

-एक्सिओस, न्यूयॉर्क टाईम्स, फॉक्स न्यूज, सीएनएन यासारख्या जागतिक माध्यम संस्थांवर होत आहेत आरोप.

-माध्यम संस्थांसोबत ट्रम्प प्रशासनाचा आधीपासून वाद. आता हा वाद नव्या स्तरावर पोहोचण्याची भीती व्यक्त.

-माहिती लीक करणारे तसेच ती प्रकाशित करणारे दोघांवरही कारवाई करण्याचे  ट्रम्प प्रशासनाकडून संकेत.

Advertisement
Tags :

.