अॅपल स्टोअरवर टेलिग्राम परतले
‘पेज नॉट फाउंड’च्या त्रुटीनंतर सेवा पूर्ववत ; लवकरच सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार
नवी दिल्ली : टेलिग्राम अॅपलच्या अॅप स्टोअरवर पुन्हा परतले आहे. अॅप पूर्ववत करण्यात आले असून ते लवकरच सर्व वापरकर्त्यांसाठी पुन्हा उपलब्ध होईल, अशी घोषणा टेलिग्रामने केली आहे. अॅप काढून टाकण्याचे किंवा त्यानंतर ते पुन्हा उपलब्ध करण्याचे नेमके कारण कंपनीने स्पष्ट केलेले नाही.
‘पेज नॉट फाउंड’ (404 एरर) म्हणजे काय?
जेव्हा एखादे अॅप किंवा वेबसाइटची लिंक निक्रिय असते, डेटाबेसमधून एखादी फाइल काढून टाकली जाते किंवा सर्व्हरवर तांत्रिक बिघाड होतो, तेव्हा सिस्टम ‘पेज नॉट फाउंड‘ किंवा 404 एरर कोड दर्शवते. याचा अर्थ असा की, वापरकर्ता ज्या युआरएलवर जाण्याचा प्रयत्न करत आहे, ती सर्व्हरवर अस्तित्वात नाही.
रशियाने टेलिग्रामच्या संस्थापकाला ‘वॉन्टेड’ यादीत टाकले
अलीकडेच, रशियाच्या मुख्य सुरक्षा संस्थेने (फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस- एफएसएस) टेलिग्रामचे संस्थापक पावेल डुरोव्ह यांच्यावर दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर, रशियाने त्यांना आपल्या आंतरराष्ट्रीय ‘वॉन्टेड’ यादीत समाविष्ट केले आहे. एफएसएसचा आरोप आहे की, रशियामध्ये घातपात, सायबर फसवणूक आणि दहशतवादी कारवाया करण्यासाठी युक्रेनच्या गुप्तचर संस्था आणि अतिरेकी संघटनांकडून वापरले जाणारे चॅनेल्स, चॅट्स आणि बॉट्स काढून टाकण्यात टेलिग्रामचे प्रशासन अपयशी ठरले आहे.
टेलिग्राम: निर्बंध असूनही लोकप्रिय
टेलिग्राम हे रशियामधील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप्सपैकी एक आहे. सुरक्षेच्या कारणास्तव, रशियन सरकारने या अॅपवर आधीच कडक निर्बंध लादले आहेत. तरीही, सामान्य जनतेसोबतच सरकारी आणि लष्करी क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींकडूनही याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.