तेजस्वी यादव अपघातातून बचावले
वाहन ताफ्याला अनियंत्रित ट्रकची धडक : 3 सुरक्षा कर्मचारी जखमी
► वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या वाहनताफ्याला शुक्रवारी मध्यरात्री अपघात झाला. या घटनेत राजद नेते थोडक्यात बचावले. मिळालेल्या माहितीनुसार, तेजस्वी यादव मधेपुराहून पाटण्याला परतत असताना ही घटना घडली. वैशाली जिल्ह्यातील गोरौलजवळ राष्ट्रीय महामार्ग-22 वर एका वेगवान ट्रकने त्यांच्या ताफ्याला धडक दिली. या घटनेत तीन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातप्रकरणी चालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी केली जात आहे.
तेजस्वी यादव यांचा ताफा राष्ट्रीय महामार्ग-22 वरून जात असताना एका वेगवान ट्रकने अचानक त्यांच्या ताफ्यातील वाहनाला धडक दिली. हा अपघात त्यांच्यापासून फक्त 5 फूट अंतरावर घडला. जर वाहन थोडे पुढे गेले असते तर मोठे नुकसान झाले असते, असे सांगण्यात आले. रात्री उशिरा घडलेल्या या घटनेनंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. जखमी सुरक्षा कर्मचाऱ्यांना उपचारासाठी स्थानिक सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या रस्ता दुर्घटनेत तेजस्वी यादव पूर्णपणे सुरक्षित आहेत ही दिलासादायक बाब आहे. अपघातानंतर लगेचच त्यांनी स्वत: रुग्णालयात पोहोचून जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. अपघातानंतर सराई पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पळून जाणाऱ्या ट्रकला पकडले आहे.