राजद उमेदवार विरोधात तेजस्वी करणार प्रचार
पाटणा :
बिहारमध्ये जागावाटपावरून महाआघाडीत कलहाची स्थिती आहे. राजदने सर्वाधिक 143 उमेदवारांची घोषणा केली असून काँग्रेसने 60 तर मुकेश सहनी यांचा पक्ष व्हीआयपीने 14 जागांवर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत 8 जागांवर महाआघाडीचे घटक पक्ष परस्परांच्या विरोधात लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशाच एका मतदारसंघात राजद नेते तेजस्वी यादव हे स्वत:च्या पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार करणार आहेत. दरभंगा जिल्ह्यातील गौडा बोराम मतदारसंघात जागावाटप निश्चित होण्यापूर्वी राजदने अफजल अली खान यांना उमेदवारी दिली होती. पक्षनेतृत्वाने त्यांना पक्षचिन्ह आणि दस्तऐवजही प्रदान केले होते. तर यानंतर राजद आणि मुकेश सहनी यांच्या विकासशील इन्सान पक्षादरम्यान जागावाटप झाले आणि गौडा बोराम मतदारसंघ व्हीआयपीला देत महाआघाडीचे सर्व घटक पक्ष त्याचे समर्थन करणार असल्याचे ठरले. व्हीआयपीने येथे संतोष सहनी यांना उमेदवारी दिली. राजद नेतृत्वाने अफजल अली यांच्याशी संपर्क साधून पक्षचिन्ह परत करण्याचे आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना केली. परंतु अफजल अली यांना असे करण्यास नकार दिला. त्यांनी राजद उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. तर अफजल अलीला पक्षाचा उमेदवार मानत नसल्याचे राजदने म्हटले आहे.
सर्व कागदपत्रांसह अर्ज दाखल झाल्याने त्यांना निवडणुकीतून हटविले जाऊ शकत नसल्याचे प्रशासनाचे सांगणे आहे. आता निवडणुकीदरम्यान ईव्हीएमवर अफजल अली यांच्या नावासमोर राजदचे कंदील चिन्ह असेल. तर तेजस्वी यादव अफजल अली विरोधात प्रचार करणार आहेत. महाआघाडीचे सर्व घटक पक्ष या मतदारसंघात व्हीआयपी उमेदवार संतोष सहनी यांच्या बाजूने असतील.