तहसिलदार बाई माने यांचा जामीन फेटाळला
वडूज :
वडूज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने तहसिलदार बाई माने व दोन तलाठ्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने महसूल विभागात चांगलीच खळबळ माजली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, वडूज तहसिल कार्यालयातील महसूल सहाय्यक प्रवीण नांगरे याच्यावर डंपर मालकाकडून 55 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी 21 नोव्हेंबर 2023 मध्ये गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलीस अधिक्षक शितल जानवे-खराडे व सहकाऱ्यांनी सखोल तपास करुन खटावच्या तहसिलदार बाई सर्जेराव माने यांच्यासह औंधचे गांवकामगार तलाठी श्री. तडवळेकर, भोसरेचे तलाठी श्री. राजमाने तसेच लिपीक रविंद्र कांबळे या चार जणांच्या विरोधात वाढीव गुन्हा नोंद करुन सहआरोपी करण्यात आले होते. याप्रकरणी वडूज येथील न्यायालयात दीर्घकाळ सुनावणी सुरु होती. तर तहसिलदारांना बेल मिळणार की निलंबित होवून कठोर कारवाईस सामोरे जावे लागणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. दोन दिवसांपूर्वी या प्रकरणाची अंतिम सुनावणी झाली होती. मात्र निकाल राखून ठेवल्याची चर्चा होती. तो निकाल आज जाहीर करुन न्यायालयाने तहसिलदारांसह दोन्ही तलाठ्यांचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. याबाबत पोलीस व बचाव पक्षाच्या वकिलांनी दुजोरा दिला आहे. मात्र अद्याप आदेश प्राप्त झाला नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
आता तहसिलदार बाई माने या प्रकरणी शरण येणार की उच्च न्यायालयात दाद मागणार याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, निकाला आधीच दोन दिवस त्या रजेवर गेल्याने त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही.