For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेशनच्या तांदळात चक्क दातांचे संच! जेवळीतील धक्कादायक प्रकाराने खळबळ

12:11 PM Sep 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
रेशनच्या तांदळात चक्क दातांचे संच  जेवळीतील धक्कादायक प्रकाराने खळबळ
Advertisement

उमरगा प्रतिनिधी : महादेव पाटील

Advertisement

धाराशिव जिल्ह्यातील जेवळी येथे रेशनच्या तांदळात चक्क दातांचे संच आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे रेशन धान्याची साठवणूक, गुणवत्ता तपासणी आणि वितरण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जेवळी येथील विधवा महिला भागाबाई बाबुराव बिराजदार यांनी शुक्रवारी गणेश प्राथमिक सहकारी ग्राहक भांडारामार्फत चालविण्यात येणाऱ्या स्वस्त धान्य दुकानातून रेशनचे तांदूळ घेतले होते. सायंकाळी त्यांच्या सुनेने भात करण्यासाठी तांदूळ चाळणीत घेतला असता, त्यामध्ये सहा ते सात दातांचे संच आढळून आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

Advertisement

यातील काही दात कुजलेल्या अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत असून, हे दात मानवी आहेत की प्राण्यांचे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या प्रकाराचे नेमके कारण काय, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र देसाई आणि पांडुरंग बिराजदार यांनीही या प्रकाराची दखल घेतली. रेशनच्या धान्यात यापूर्वी किडे, आळ्या तसेच जाळ्या आढळल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यात आता तांदळात दातांचे संच आढळल्याने धान्याची साठवणूक आणि गुणवत्ता तपासणीच्या प्रक्रियेवर नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

या प्रकरणाची प्रशासनाने तातडीने चौकशी करावी, संबंधित तांदळाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत आणि दोष आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रेशनधारकांकडून करण्यात येत आहे.

रेशनच्या तांदळात हे दात नेमके आले कुठून, धान्य साठवणुकीदरम्यान हा प्रकार घडला की वितरणापूर्वीच तांदळात हे आढळून आले, याचा तपास प्रशासन कसा करते, याकडे आता जेवळीकरांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.