For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

'टेडएक्स'च्या जागतिक व्यासपीठावर सावंतवाडीच्या विकासाचा आराखडा; नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांचे पुण्यात प्रभावी सादरीकरण

02:55 PM Nov 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
 टेडएक्स च्या जागतिक व्यासपीठावर सावंतवाडीच्या विकासाचा आराखडा  नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांचे पुण्यात प्रभावी सादरीकरण
Advertisement
सावंतवाडी : सावंतवाडी शहराचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटनाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर विकास करण्याची संकल्पना आता आंतरराष्ट्रीय विचारपीठावर मांडण्यात आली आहे. सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले आणि सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे सावंत-भोसले यांनी पुणे येथे आयोजित प्रतिष्ठित टेडएक्सआयबीएस पुणे या कार्यक्रमात सावंतवाडीच्या विकासाचा दूरदृष्टीपूर्ण आराखडा सादर केला. त्यांच्या या सादरीकरणातून पर्यटन, उद्योग, हस्तकला आणि रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून शहराचा कायापालट करण्याची संकल्पना मांडण्यात आली.

 'सीमांच्या पलीकडे' या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आपले विचार मांडले. यावेळी श्रद्धा सावंत-भोसले यांनी सावंतवाडी संस्थानकालीन शहराचा समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपत आधुनिक विकास साधण्याची गरज अधोरेखित केली.

Advertisement

सावंतवाडीचा विकास केवळ शहरापुरता मर्यादित न ठेवता आजूबाजूच्या गावांनाही त्याचा लाभ मिळावा, हा आमचा संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पर्यटन आणि हॉटेल उद्योगाला चालना देऊन स्थानिक युवक आणि महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे, पारंपरिक कला आणि हस्तकलेला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, यावर त्यांनी विशेष भर दिला.

सावंतवाडीची ओळख असलेल्या गंजिफा कला, लाकडी खेळणी आणि चितारीकाम यांसारख्या पारंपरिक कलांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता त्यांनी मांडली. या कलांच्या संवर्धनातून स्थानिक कलाकारांना आर्थिक स्थैर्य मिळू शकते. तसेच पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक उद्योग, व्यवसाय आणि हॉटेल क्षेत्राचा विस्तार करून शहराच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देता येईल, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

यावेळी सावंतवाडी पॅलेसच्या उभारणीचा प्रवासही त्यांनी उपस्थितांसमोर मांडला. ऐतिहासिक राजवाड्याचे कलात्मक निवासस्थानात रूपांतर करताना ऐतिहासिक वारसा जपण्यासोबतच पर्यटन आणि रोजगारनिर्मितीच्या नव्या संधी कशा निर्माण झाल्या, याची माहिती दिली.

युवराज लखमराजे सावंत-भोसले यांनीही सावंतवाडीच्या विकासामागील आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, सावंतवाडी पॅलेस उभारणे हा केवळ निवासस्थान किंवा व्यवसाय निर्माण करण्याचा प्रयत्न नव्हता, तर आपल्या शहराला आणि येथील लोकांना काहीतरी परत देण्याची प्रामाणिक भावना त्यामागे होती. आपली मुळे ज्या भूमीत रुजली आहेत, त्या भूमीच्या विकासासाठी प्रत्येकाची जबाबदारी असते. सावंतवाडीने प्रगती करावी, समृद्ध व्हावे आणि तिची खरी ओळख जगभर पोहोचावी, हीच आमची इच्छा आहे.

सावंतवाडीचा ऐतिहासिक वारसा, पारंपरिक कला, पर्यटन आणि आधुनिक उद्योग यांची सांगड घालून शहराला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देण्याचा निर्धार दोघांनीही व्यक्त केला. त्यांच्या या विकासात्मक संकल्पनेचे कार्यक्रमातील उपस्थितांनी कौतुक केले.

Advertisement
Tags :

.