महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तंत्रज्ञांची ‘मारामारी’

06:58 AM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

Advertisement

टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलॉन मस्क यांनी शनिवारी केलेल्या ट्विटमध्ये  ईव्हीएमचा वापर बंद करावा असं म्हटलं. मस्क यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणाऱ्या रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर यांचं एक ट्वीट रीट्वीट केलं. ‘आपण इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा वापर बंद करावा. मानवी किंवा कृत्रिम बुद्धिमत्ताद्वारे ते हॅक होण्याची शक्यता कमी असली तर हा धोका मोठा आहे,’ असं मस्क यांनी या ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यावर उत्तर देताना, चिप डिझायनिंग क्षेत्रात काम केलेले मोदी सरकारचे माजी आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मस्क यांचा दावा चुकीचा असल्याचं त्यांना उत्तर देताना म्हटलं. गेल्या सरकारमधील माजी आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मस्क यांच्या ट्विटला उत्तर दिलं. ‘मस्क जे बोलत आहेत ते अमेरिका किंवा इतर ठिकाणी असू शकतं. तिथं कॉम्प्युटर प्लॅटफॉर्मचा वापर करून, इंटरनेट कनेक्टेड व्होटिंग मशीन तयार केल्या जातात. पण भारतीय ईव्हीएम वेगळे आहेत. ते खास तयार केलेले असतात. ते सुरक्षित असतात आणि नेटवर्क किंवा मीडियाशी कनेक्टेड नसतात,’ असं चंद्रशेखर यांनी ट्विटमध्ये म्हटलं. ‘ईव्हीएम भारतासारखे डिझाईन आणि तयार करायला हवे. त्यासाठी तुम्हाला ट्युटोरियल पाठवायला आम्हाला आनंद होईल,’ असंही चंद्रशेखर म्हणाले. चंद्रशेखर यांनी सविस्तर दिलेल्या या माहितीवर मस्क यांनी मोजक्या शब्दांत उत्तर दिलं. ते म्हणजे, ‘काहीही हॅक केले जाऊ शकते.’ मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातल्या निकालाचा वाद आणि त्यातून दोन तंत्रज्ञांची ही ‘मारामारी’ सगळ्या जगाने पाहिली. रविवारी यात उडी घेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंग्रजी दैनिकाचे एक कात्रण ट्विट केलं. या वृत्तपत्राच्या बातमीत विजयी झालेले शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाकडं ईव्हीएम अनलॉक करणारा फोन असल्याचा दावा पोलिसांच्या हवाल्यानं करण्यात आला होता. या मतदारसंघात अगदी एका मताच्या फरकापर्यंत लढत पोहोचली होती. नंतर अखेर दोन वेळा पुनर्मतमोजणी केल्यानंतर शिंदे पक्ष उमेदवार रविंद्र वायकर यांना 48 मतांनी विजयी जाहीर करण्यात आले. यामध्ये गैरप्रकार घडल्याची शक्यता असल्याचं सांगत प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी वनराई पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. तसंच ठाकरे पक्षाने या प्रकरणी कोर्टात धाव घेणार असल्याचंही म्हटलं आहे. मतमोजणी सुरू असताना ईव्हीएम हॅक करण्यात आले असून पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली अशी चर्चा सुरू झाली. याबाबत पोलिसांनी अशी कोणतीही माहिती वृत्तपत्रांना दिली नसल्याचा खुलासा केला आहे. मात्र या प्रकरणात ऑपरेटरला निलंबित करण्यात आले आहे. मंगेश पुंडीलकर आणि निवडणूक आयोगाच्या एन्कोर पोर्टलचा ऑपरेटर दिनेश गुरव या दोघांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ही सगळी कारवाई गुपचूप सुरू असल्याचे ठाकरे पक्षाचे म्हणणे आहे. तर या मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी मोबाईलद्वारे हॅक करता येत नाही तसेच कोणत्याही ओटीपीद्वारे तो अनलॉक करता येत नाही असा निर्वाळा दिला आहे. त्यावर ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी वंदना सूर्यवंशी याच वादग्रस्त अधिकारी असल्याचे वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीसुद्धा केवळ वायव्य मुंबई मतदार संघातील ईव्हीएमबद्दलच का शंका उपस्थित केली जात आहे? असा प्रश्न उपस्थित करून राहुल गांधी दोन ठिकाणाहून निवडून आले आहेत त्यांनी ईव्हीएमवर अविश्वास दाखवून पुन्हा निवडणूक घ्यावी असे आव्हान दिले आहे. अर्थात मूळ शब्दिक वाद दोन तंत्रज्ञानाशी संबंधित मंडळींमध्ये सुरू झाला आणि नंतर त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले. त्यामुळे राजकारणात असलेल्या एखाद्या तंत्रज्ञाचे यावर काय मत आहे हे पुढे येण्याची ही आवश्यकता होती आधी चंद्रशेखर आणि त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण या दोन राजकीय मात्र तंत्रज्ञ नेत्यांची मते महत्त्वाची मानली पाहिजेत. अर्थात दोघे दोन बाजूचे असल्यामुळे दोन्ही बाजू त्यातून पुढे येतील. चंद्रशेखर यांनी भारतातील ईव्हीएमची रचना अमेरिकेपेक्षा वेगळी आहे ते इंटरनेट ब्लूटूथ वायफाय अशा कशाशीही जोडलेले नाही. यंत्रातील इनबिल्ट प्रोग्रॅममध्ये हेराफेरी करता येत नाही. वेळ पडली तर भारतातील ईव्हीएमचे प्रात्यक्षिक मस्क यांना दाखवले जाईल आणि अमेरिकेतील परिस्थितीत मस्क यांचे मत योग्य असेल भारताबद्दल नाही अशी भूमिका त्यांनी मांडली. तर पृथ्वीराज चव्हाण यांनी ही घटना मतमोजणीच्या दिवशी म्हणजे 4 जून रोजी घडली. 14 जूनला पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पण एफआयआर गुप्त ठेवण्यात आला आहे. तक्रारकर्त्याला कॉपीही दिली नाही. कोणत्याही मोबाईल फोनवर ईव्हीएम उघडण्यासाठी ओटीपी जनरेट होतो, हेच मी पहिल्यांदा ऐकत आहे. इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टम फॉर सर्व्हीस वोटर ही प्रणाली आहे, याबद्दलही मी पहिल्यांदाच ऐकत आहे. ही प्रणाली हॅक केली का? त्यात मतांची अदलाबदली झाली का? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. कीर्तिकरांचा पराभव 48 मतांनी झाला. पण आधीच्या राऊंडमध्ये ते आघाडीवर होते. त्यामुळं निवडणूक आयोगाने यावर बैठक बोलावून याबाबत निवेदन जाहीर करावे. यावर वैश्विक चर्चा सुरू झाली आहे. एलॉन मस्क यांनीही ट्वीट करून, मशीन हॅक होऊ शकते म्हटल्याने आयोगाने या गंभीर प्रकरणी विरोधी पक्षातील सर्व नेत्यांची बैठक बोलावून या प्रक्रियेवर विश्वास प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी केली आहे. अर्थात ही समन्वयाची पध्दत निवडणूक आयोगाला आणि राजकीय पक्षांना पटते किंवा नाही हा मुद्दा मशिन हॅक होते की नाही आणि कोंबडी आधी की अंडे? इतकाच महत्त्वाचा! तिथं तंत्रज्ञच काय? विचारही खुंटतो!

Advertisement

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article