एअर इंडिया विमानात तांत्रिक समस्या
आकाशात 300 फूट आले खाली, 14 जखमी
► वृत्तसंस्था
नवी दिल्ली
थायलंड या देशाचे बेट असणारे फुकेत येथून दिल्लीकडे येत असलेल्या एअर इंडियाच्या विमानात ते आकाशात असतानाच तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने ते अचानक 300 फूट खाली आल्याची घटना घडली आहे. विमानाची उ•ाण उंची अचानक कमी झाल्याने काही प्रवाशांना धक्का बसल्याने ते जखमी झाले. जखमींमध्ये 10 प्रवासी आणि 4 विमान कर्मचारी यांचा समावेश आहे. तथापि, नंतर विधान दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित उतरविण्यात आले.
विमान दिल्लीत उतरविल्यानंतर सर्व जखमींना त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. उपचार केल्यानंतर काही जखमींना घरी जाऊ देण्यात आले आहे. काही जखमींवर अद्यापही उपचार केले जात आहेत. काही प्रवाशांच्या कानाचे पडदे दुखावले असल्याची माहिती देण्यात आली. काही प्रवाशांना मुका मार लागला आहे. त्यांच्यावर दिल्लीच्या फोर्टीस रुग्णालयात उपचार होत आहेत, असे स्पष्ट करण्यात आले. फोर्टिस रुग्णालयाने एका वक्तव्याद्वारे या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे.
चौकशी केली जाणार
आकाशातून प्रवास करीत असताना विमान अचानक विमानाची उ•ाण उंची अचानक कमी कशी झाली, हे गूढ असून या प्रकाराची चौकशी केली जाणार आहे. उंची अचानक कमी झाली, तरी विमानचालकाने सत्वर या परिस्थितीवर नियंत्रण मिळवत विमान पुन्हा नेहमीच्या उंचीवर नेले. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली नाही. तथापि, काही काळ विमानातील प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती.
एअर इंडियाचे निवेदन
हा प्रसंग कसा घडला, यासंबंधी एअर इंडियाने मंगळवारी संध्याकाळी एक निवेदन प्रसारीत केले आहे. काही क्षणांसाठी विमानाची उंची साधारणत: 300 फुटांनी कमी झाली होती. तथापि, हा प्रकार केवळ काही सेकंद इतक्याच काळापुरता घडला होता. तथापि, त्या धक्क्याने काही प्रवाशांना जखमा झाल्या आहेत. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांचे एक दल सर्व जखमी प्रवाशांच्या उपचारांवर लक्ष ठेवून आहे. सर्व प्रवासी सुखरुप आहेत. जखमींवर योग्य ते उपचार होत आहेत. त्यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती देण्यात आली असून कोणत्याही जखमीची परिस्थिती गंभीर नाही, असे स्पष्टीकरण विमान कंपनीकडून दिले गेले.