श्रीलंकेत दूध उत्पादन वाढविण्यास एनडीडीबी-अमूलचे तांत्रिक सहाय्य
वृत्तसंस्था/ कोलंबो
श्रीलंकेला डेअरी उद्योग व दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी भारत देश तांत्रिक मदत करणार आहे. यामुळे येत्या काळात आयात केलेल्या दुग्धजन्य पदार्थांवर रोखीने अडचणीत असलेले देशाचे अवलंबित्व कमी होणास मदत होणार असल्याचेही म्हटले जात आहे. या संदर्भातील माहिती श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
सादर करण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे, की राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (एडीडीबी) आणि गुजरात को ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (जीसीएमएमएफ), जे अमूल ब्रँड अंतर्गत दुधाची विक्री करतात, त्यांनी दुग्ध उत्पादनासाठी आवश्यक तंत्रज्ञानावर चर्चा केली असल्याचेही यावेळी स्पष्ट केले आहे.
श्रीलंकेचे राष्ट्रध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी देशातील स्थानिक दुधासाठी आयात केलेल्या दुधाच्या पावडरीवरील अहलंबित्व कमी करण्यासाठी एनडीडीबी याच्या टीमसोबत काम करण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश असलेली समिती नियुक्त केली आहे. यात उत्पादन वाढविण्यासाठी अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन योजना तयार करण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे.
यांनी घेतला चर्चेत सहभाग
कृषी मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ. निमल समरनायके, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक एच.डब्लू.सिरिल आणि कृषी मंत्रालयाचे अधिकारी, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ऑफ इंडियाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक राजेश ओंकारनाथ गुप्ता, महाव्यवस्थापक सुनील शिवप्रसाद सिन्हा, वरिष्ठ व्यवस्थापक राजेश कुमार शर्मा आणि इतर प्रतिनिधींनी यावेळी चर्चेत सहभाग घेतला होता.