For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विमानाचा आवाज ऐकताच आनंदाश्रू

06:49 AM May 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
विमानाचा आवाज ऐकताच आनंदाश्रू
Advertisement

इसमाला अजब आजार, कुठलाच नाही उपचार

Advertisement

जगात अनेक धोकादायक आजार असून त्यावर कुठलाच उपचार नसतात. डिमेंशिया देखील असाच आजार आहे. अलिकडेच एका इसमाला डिमेंशिया झाल्याचे निदान झाले, परंतु त्याची लक्षणे अत्यंत विचित्र आहेत. त्याला एक खास प्रकारचा आवाज इतका पसंत पडू लागला की तो ऐकताच तो आनंदाने रडू लागतो. डिमेंशिया आजारात माणसाची स्मरणशक्ती, विचारशक्ती, वर्तन आणि दैनंदिन काम करण्याची शक्ती हळूहळू प्रभावित होते. जगभरात सुमारे 5.5 कोटीहून अधिक लोक या आजाराला तोंड देत आहेत. तर अमेरिकेतच जवळपास 70 लाख लोक डिमेंशियाचे रुग्ण आहेत.

एका नव्या रुग्णात डिमेंशियाचे अत्यंत अनोखे लक्षण दिसून आले. हे लक्षण भविष्यात या आजाराची ओळख पटविण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते असे तज्ञांचे सांगणे आहे. एका 68 वर्षीय इसमाला डिमेंशिया झाल्याचे निदान होण्याच्या 2 वर्षांपूर्वी एक खास प्रकारचा आवाज अत्यंत पसंत पडू लागला होता. या इसमाला स्पिटफायर फायटर प्लेनच्या इंजिनचा आवाज अत्यंत पसंत पडू लागला होता. या रुग्णाचा उल्लेख सीपी असा करण्यात आला असून त्याचे घर एका धावपट्टीनजीक होते. जेथून अनेकदा स्पिटफायर विमानांचे उ•ाण व्हायचे. सीप विमानाचा आवाज ऐकताच त्वरित बाहेर पडून विमानाच्या दिशेने हात उंचावून आनंदाने रडू लागायचा असे त्याच्या पत्नीने सांगितले आहे.

Advertisement

बिहेवियरल फ्रंटोटेम्पोरल डिमेंशिया

हा उत्साह केवळ स्पिटफायर विमानाच्या आवाजासाठीच होता. अन्य विमानांचा आवाज किंवा सामान्य स्वरुपात एव्हिएशनमध्ये त्याला कुठलीच खास रुची नव्हती. काही काळानंतर डॉक्टरांनी तपासणीनंतर सीपीला बिहेवियरल फ्रंटोटेम्पोरल डिमेंशिया (एफटीडी) नावाचा आजार असल्याचे निदान केले. हा डिमेंशियाचा एक दुर्लभ प्रकार असून तो मेंदूच्या फ्रंटल आणि टेम्पोरल हिस्स्यांना प्रभावित करतो. हा आजार सर्वसाधारणपणे 45-64 वर्षांच्या वयादरम्यान अधिक दिसून येतो. या आजारात रुग्णांना सामान्य डिमेंशियाच्या तुलनेत स्मरणशक्तीची समस्या कमी असते. परंतु त्यांच्या वर्तन आणि व्यक्तिमत्त्वात मोठा बदल घडून येऊ शकतो. अनेकदा रुग्णांमध्ये भावनात्मक बदल, संताप, अजब वर्तन आणि सामाजिक नियमांकडे दुर्लक्ष अशी लक्षणे दिसून येतात. सीपीमध्ये देखील अशाप्रकारचे बदल दिसून आले. त्याचा अचानक मूड स्विंग होऊ लागला, तो लवकर चिडचिड करत होता आणि इतरांना बोलण्यापासून रोखत होता, याचबरोबर त्याला गोड खाण्याची सवय जडली होती. तसेच त्याला बुद्धिबळ आणि शब्दकोड्यांचा मोठा छंद जडला होता. पक्ष्यांचा आवाज आणि कुणी मोठ्या आवाजात बोलू लागल्यास तो चिडत होता.

मेंदूच्या एका हिस्स्यात हानी

सीपीला अनेक लोकांचे चेहरे ओळखण्यास अडचण व्हायची. परंतु फोनवरील आवाज ऐकून तो लोकांना सहजपणे ओळखत होता. त्याच्या जुन्या आठवणी आणि भाषेशी निगडित स्मृतीवर फारसा प्रभाव पडला नव्हता. सीपीचे प्रकरण डिमेंशियाच्या एका नव्या प्रकाराकडे इशारा करते, ज्याला राइट टेम्पोरल वेरिएंट एफटीडी म्हटले जाते. यात मेंदूच्या उजव्या टेम्पोरल हिस्स्यात पेशींची कमी किंवा हानी दिसून येते, जे सामाजिक संकेत आणि बिगरतोंडी माहिती समजून घेण्यास महत्त्वाची भूमिका बजावते. एमआयआर स्कॅनमध्येही सीपीच्या मेंदूच्या या हिस्स्यात पेशींची कमतरता दिसून आली. तज्ञांनुसार कुठलीही खास गोष्ट किंवा आवाजाबद्दल अत्याधिक ओढा या आजाराची ओळख ठरू शकते. डिमेंशियाचा संबंध ऐकण्याच्या क्षमतेशीही असू शकतो असे संशोधकांचे मानणे आहे. ऐकण्याच्या समस्येमुळे डिमेंशिया होतो असे अनेक लोक मानतात. परंतु सीपीच्या प्रकरणातून डिमेंशिया देखील माणसाची ऐकण्याची पसंत आणि प्रतिक्रिया बदलू शकतो हे दिसून येते.

Advertisement
Tags :

.