आसामचे अश्रू
आसाममधील पुराने सध्या हाहाकार उडवला असून, या महाप्रलयाने शंभरहून अधिक जणांचा जीव घेतला आहे. 13 ते 15 जिल्ह्यांना वेढणाऱ्या या पुरामुळे जवळपास दोन लाख लोक बाधित झाल्याचे सांगण्यात येते. या आपत्तीस येथील भौगोलिक रचना, ढगफुटी वा नैसर्गिक संकटाबरोबरच मानवी हस्तक्षेपही कारणीभूत असल्याचे दिसून येते.
देशाच्या ईशान्य भागातील महत्त्वाचे राज्य म्हणजे आसाम. प्राचीन ग्रंथामध्ये जलप्रदेश म्हणूनही आसामचा उल्लेख आढळतो. ब्रह्मपुत्रा आणि बराक या येथील महानद्या. या नद्यांना 50 हून अधिक उपनद्या मिळतात. त्यामुळे जवळपास दरवषी पावसाळ्यात पुरामुळे विध्वंस घडतो. येथील पुराची व्याप्ती, कालावधी आणि मातीची धूप होण्याचे प्रमाण आदी समस्या आसाममध्ये इतर राज्यांपेक्षा अधिक आहेत. राष्ट्रीय पूर आयोगाच्या मूल्यांकनानुसार राज्याचे एकूण क्षेत्रफळ 78.523 लाख हेक्टर असताना राज्यातील पूरप्रवण क्षेत्र 31.05 लाख हेक्टर आहे. हे प्रमाण आसामच्या एकूण भूभागाच्या सुमारे 39 टक्के, तर देशाच्या एकूण पूरप्रवण क्षेत्राच्या सुमारे साडेनऊ टक्के इतके आहे. यातून आसाम आणि पूर यांच्यातील नाते स्पष्ट होते. स्वातंत्र्योत्तर काळात आसामला 1954, 1962, 1972, 1977, 1984, 1988, 1998, 2002, 2004, 2012 तसेच 2019 व 2020 मध्येही महापुराशी दोन हात करावे लागले. यातील 2019 चा पूर अलीकडच्या काळातल्या सर्वाधिक विनाशकारी म्हणता येईल. या पुराचा जवळपास 23 टक्के जनतेवर परिणाम झाला व शंभरहून नागरिकांचा त्यात बळी गेला होता. यंदाचा पूरही असाच महाविनाशकारी असून 15 जिल्ह्यातील तब्बल दीड ते दोन लाख लोकांना या पुराचा तडाखा बसला आहे. लाखो हेक्टर जमीन वाहून गेली असून, त्यावरील पिके मातीमोल झाली आहेत. पशुधनही गमवावे लागल्याने बळीराजा देशोधडीला लागला आहे. सर्वसाधारणपणे दरवषी पुराच्या तीन ते चार लाटा आसामच्या पूरप्रवण भागांना उद्ध्वस्त करतात. तथापि, या वर्षी पूरप्रवण नसलेल्या भागातील नागरिकांनाही पुराची झळ बसली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. आसाममध्ये पुरामुळे होणारे सरासरी वार्षिक नुकसान सुमारे 200 कोटी ऊपये असल्याचे सांगण्यात येते. किंबहुना, 1998 व 2007 मध्ये हे नुकसान अनुक्रमे सरासरी पाचशे ते साडेसातशे कोटी रुपयांपर्यंत झाल्याची आकडेवारी आसाम सरकारच्याच एका संकेतस्थळावर देण्यात आली आहे. मुळात आसामची भौगोलिक रचना वैशिष्ट्यापूर्ण आहे. निसर्गत: पर्वतमय प्रदेशाची कूस या राज्यास लाभली आहे. अरुणाचल प्रदेश व भूतानसारख्या डोंगराळ भागांत मुसळधार पाऊस होतो. या पावसामुळे ब्रम्हपुत्रा व बराकसारख्या नद्या प्रचंड प्रमाणात गाळ वाहून आणतात. त्यातून राज्याचा मोठा भूप्रदेश जलमय होतो. सप़ृतदर्शनी पुरास अतिवृष्टी व मातीची धूप व गाळ हे कारण असले, तरी अन्य कारणेही दिसतात. आसामच्या वरच्या बाजूला असलेल्या शेजारील राज्यांमध्ये जंगलतोड व खाणकाम मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे सुपीक माती नद्यांद्वारे वाहून जाते व गाळ निर्माण होऊन पुराची तीव्रता वाढते. याशिवाय मागच्या काही वर्षांत पूरमैदानांवर मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले असून, शेतजमिनीच्या वापरामुळेही परिस्थिती बिघडत आहे. मुळात मानवी आक्रमणामुळे पाणथळ जागा घटत आहेत. त्यामुळे पुराच्या पाण्याचा निचरा व जमिनीत पाणी मुरण्याची प्रक्रिया खंडित झाली आहे. याशिवाय कालवे, नाले यांचे प्रदूषणही या साऱ्यात भर घालत आहे. हवामान बदल ही तर आता जागतिक समस्याच बनली आहे. ढगफुटी वा कमी कालावधीत होणाऱ्या अधिकतम पावसाने पूराची समस्या अधिक अक्राळविक्राळ होत आहे. हे बघता भविष्यात पूर व्यवस्थापनासाठी व्यापक पद्धतीने काम करावे लागेल. त्यासाठी नद्यांमधील गाळ काढणे, जमिनीची धूप थांबवण्यासाठी जंगलतोड रोखणे, खाणकामावर निर्बंध घालणे, वृक्षारोपणाची चळवळ हाती घेणे आणि राज्यातील अतिक्रमणांना आळा घालणे व अचूक हवामान अंदाजाचा वापर करणे, यांसारख्या उपाययोजनांचा अवलंब करावा लागेल. आज आसाममध्ये अश्रूंचा महापूर लोटला आहे. अशा वेळी प्रत्येकाला मदतीचा हात पुढे करावा लागेल. शिवाय पुराच्या या चक्रातून राज्याची मुक्तता करण्यासाठी दीर्घकालीन उपायही योजावे लागतील.