भारतीयांच्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड किताबात चमकली ‘टीम स्पिरीट’
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील सुवर्णपदकांच्या प्राप्तीने भारताचे एक स्वप्न पूर्ण झाले आहे. पुरुष संघाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास पाच बलवान भारतीय बुद्धिबळपटूंच्या स्पर्धेतील मोहिमेचे नेतृत्व जगज्जेतेपदासाठीचा सर्वांत तरुण आव्हानवीर डी. गुकेशने केले. चीनच्या डिंग लिरेनविरुद्धच्या त्याच्या जागतिक स्पर्धेची उत्सुकतेने प्रतीक्षा केली जात असून सदर लढतीपूर्वी या 18 वर्षीय खेळाडूने एक प्रकारचा इशारा दिला आहे.
रविवारी स्लोव्हेनियाच्या जायंट-किलर व्लादिमीर फेडोसेव्हविऊद्धचा शेवटच्या फेरीतील सामना जिंकल्यानंतर गुकेश म्हणाला की, मी सध्या खूप आनंदित आहे. भारतासाठी अव्वल फळीतील या युवा खेळाडूचे प्रदर्शन सनसनाटी राहिले. कारण त्याने त्याच्या 10 सामन्यांतून 9 गुण मिळवले आणि आठ विजयांसह फक्त दोन बरोबरीत सोडविले. या अभूतपूर्व कामगिरीमुळे संघाला सुवर्ण जिंकण्यास मदत झाली. भारताने संभाव्य 22 पैकी 21 गुण मिळवताना 10 सामने जिंकले आणि मागील ऑलिम्पियाडचे विजेते उझबेकिस्तानविऊद्धचा फक्त एक सामना बरोबरीत सोडविला.
ऑलिम्पियाडच्या अंतिम पत्रकार परिषदेत गुकेश म्हणाला की, माझ्यासाठी व्यक्तिश: आणि संघासाठी हा खूप छान अनुभव राहिला. मुळात ही एक स्वप्नवत वाटचाल होती. महिलांनीही सुवर्ण जिंकण्यात यश प्राप्त केले आणि दोन्ही संघ व्यासपीठावर आनंद साजरा करताना दिसले. पुऊषांच्या यशात आणखी एक महत्त्वाचा वाटा अर्जुन एरिगेसीचा राहिला. त्याने या स्पर्धेत सर्व 11 सामने खेळून 10 गुण मिळवले. त्याने आता लाईव्ह जागतिक क्रमवारीत नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन आणि अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा यांच्यामागे तिसरा क्रमांक पटकावला आहे.
सध्या 2797 च्या रेटिंगसह अर्जुन 2800 गुणांपेक्षा फक्त तीन गुणांनी मागे आहे आणि नाकामुरापेक्षा पाच गुणांनी मागे आहे. ऑलिम्पियाडच्या सुऊवातीला भारतीय संघातील सर्वोच्च रेटिंग असलेला खेळाडू असूनही तो तिसऱ्या पटावर का खेळला असे विचारले असता एरिगेसी म्हणाला की, हा रणनीतीचा भाग होता. विदित गुजराथीवर तेवढा प्रसिद्धीचा झोत पडलेला नसला, तरी त्यानेही 10 सामन्यांतून 7.5 गुण मिळवले. परंतु चौथ्या पटावरील कामगिरीच्या रेटिंगमध्ये तो चौथ्या स्थानावर राहिला. प्रज्ञानंदची कामगिरी त्याच्या अपेक्षेनुसार राहिलेली नसेल, पण त्याने विशेषत: नवव्या सामन्यापर्यंत संघाला आवश्यक स्थैर्य मिळवून देण्याची जबाबदारी अचूक पेलली.