For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

भारतीय महिलांना सांघिक रौप्यपदक

06:37 AM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय महिलांना सांघिक रौप्यपदक
Advertisement

महिलांच्या 10 मी. एअर रायफल पटकावले पदक, इतरांकडून निराशा तर मिश्र जोडी ठरली अपात्र

Advertisement

वृत्तसंस्था, दोहा

येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारतीय  महिला संघाने 10 मी. एअर रायफल प्रकारात रौप्य पदक मिळविले. महिलांच्या 10 मी. एअर रायफल सांघिक प्रकारात एलावेनिल वलरिवन, सोनम उत्तम मस्कर आणि शांभवी श्रावण क्षीरसागर या भारतीय त्रिकुटाने एकूण 1894.4 गुण मिळवून दुसरे स्थान पटकावले. चीनने 1899.8 गुणांसह सुवर्णपदक जिंकले तर जपानने 1892.6 गुणांसह कांस्यपदक मिळवले. भारतीय खेळाडूंमध्ये एलावेनिलने सर्वोत्तम कामगिरी करत 634.2 गुण नोंदवले तर सोनमने 630.5 आणि शांभवीने 629.7 गुण मिळवले. पात्रता फेरीत तिसऱ्या क्रमांकावर राहिल्यामुळे एलावेनिल वैयक्तिक अंतिम फेरीसाठी पात्र ठरली होती. तिच्याकडे पदक जिंकण्याची आणि भारताला पहिले ऑलिम्पिक कोटा स्थान मिळवण्याची चांगली संधी होती. परंतु अंतिम फेरीत ती 167.3 गुणांसह सहाव्या स्थानावर राहिली. सध्या भारत एक सुवर्ण आणि दोन रौप्यपदकांसह पदकतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तीन सुवर्णपदकांसह एकूण पाच पदके मिळवून चीन अव्वल स्थानावर आहे.

Advertisement

भारतीय नेमबाजांची निराशाजनक कामगिरी

मात्र बुधवारी भारतीय नेमबाजांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यांना अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात अपयश आले. तसेच एका खेळाडूच्या अपात्रतेमुळे भारतीय संघाच्या अडचणीत भर पडली आहे. या कामगिरीमुळे 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी कोटा मिळवण्याच्या भारताच्या आशांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक आणि 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल या दोन्ही प्रकारांत भारतीय खेळाडूंना पदकासाठी आव्हान निर्माण करता आले नाही. त्यातच एका खेळाडूंच्या अपात्रतेमुळे भारतीय संघाच्या समस्या अधिकच वाढल्या आहेत. 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात सोनम उत्तम मस्कर आणि हिमांशू धिल्लन यांची जोडी अंतिम फेरीसाठी पात्र ठरु शकली नाही. त्यांनी एकूण 632.4 गुणांस सातवे स्थान मिळवले. यामध्ये सोनमने 316.6 तर हिमांशूनं 315.8 गुण नोंदवले, शांभवी क्षीरसागर आणि पार्थ माने यांची जोडी स्पर्धेत अपात्र ठरली. आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या पोशाख आणि उपकरणांशी संबंधित नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारातही भारताच्या पदकाच्या आशा मावळल्या. या प्रकारातील तीनही भारतीय नेमबाजांना अंतिम फेरीतील आठ जणांच्या गटात स्थान मिळवता आले नाही.

Advertisement
Tags :

.