वनडे मालिकेत टीम इंडियाचा विजयारंभ
इंग्लंडवर चार विकेट्सनी मात : श्रेयस अय्यर, शुभमन गिल, अक्षर पटेलची अर्धशतके : जडेजा, हर्षित राणाचे तीन बळी
वृत्तसंस्था/नागपूर
सामनावीर शुभमन गिलची 87 धावांची खेळी, श्रेयस अय्यरची वादळी आणि महत्त्वपूर्ण फटकेबाजी, संकटमोचक अक्षर पटेलचे अर्धशतक अन् भारताच्या गोलंदाजांची भेदक गोलंदाजी यांच्या बळावर भारताने इंग्लंडवर पहिल्या वनडेत सहज विजय मिळवला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेला इंग्लंड 248 धावा करत 47.4 षटकांत सर्वबाद झाला. तर टीम इंडियाने विजयासाठीचे लक्ष्य 38.4 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात पार केले. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता, उभय संघातील दुसरा सामना दि. 9 रोजी कटक येथे होईल.
भारताने या सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लिश सलामीवीर फिल सॉल्ट आणि बेन डकेटने अवघ्या 9 षटकांत 75 धावा करत जोरदार सुरूवात करुन दिली. पण फिल सॉल्ट धावबाद झाल्यानंतर टीम इंडियाने पुनरागमन केले. यात पदार्पणवीर हर्षितची भूमिका महत्त्वाची होती. त्याने आधी बेन डकेट (32) आणि नंतर हॅरी ब्रूक (0) व लिव्हिंगस्टोन (5) यांच्या विकेट घेतल्या. रवींद्र जडेजाने पुन्हा जो रुटला (19) आपला बळी बनवले. कर्णधार जोस बटलरसह युवा अष्टपैलू जेकब बेथेल या दोघांनी संघाचा डाव सावरला. प्रथम बटलरने (52) अर्धशतक झळकावले आणि नंतर तो बाद झाल्यानंतर जेकब बेथेल (51) यांनी संघाला 200 धावांचा टप्पा गाठून दिला. त्याने आपले अर्धशतकही पूर्ण केले मात्र तोही जडेजाच्या गोलंदाजीवर बाद झाला. शेवटी, जोफ्रा आर्चरने (21) काही मोठे फटके मारले आणि संघाला 248 धावांपर्यंत नेले. हर्षित आणि जडेजाने प्रत्येकी 3 विकेट घेतले. तर शमी, अक्षर आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
रोहित पुन्हा फ्लॉप,श्रेयस, गिलची फटकेबाजी
249 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पदार्पणवीर यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रोहित शर्माने सुरुवात केली. पण आर्चर आणि साकिब महमूद यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीसमोर या दोघांना फार धावा करता आल्या नाहीत आणि दोघेही झेलबाद होत माघारी परतले. कर्णधार रोहितने (2) पुन्हा एकदा निराश केले. कसोटी
फॉर्मेटमध्ये त्याचा खराब फॉर्म वनडेमध्येही कायम राहिला. जैस्वालला 15 धावा करता आल्या. सलामीची जोडी बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने आक्रमक सुरूवात केली आणि भारतीय संघात पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले. श्रेयस आणि शुभमन गिल यांनी दमदार खेळी करत विजयाचा पाया रचला. अय्यरने अवघ्या 30 चेंडूत अर्धशतक झळकावले. श्रेयसने 9 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 59 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. तो बाद झाल्यानंतर गिलने 14 चौकारासह 87 धावांची खेळी साकारली. त्याला अक्षर पटेलने 52 धावा करत मोलाची साथ दिली. यामुळे भारताने 38.4 षटकांतच विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली.
जडेजाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 विकेट्स
रवींद्र जडेजाने इंग्लंडविरूद्ध पहिल्या वनडे सामन्यात 26 धावा देत 3 विकेट्स घेत आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 विकेट्सचा टप्पा गाठला आहे. आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 विकेट घेणारा जडेजा भारताचा पाचवा गोलंदाज ठरला आहे. यासह त्याने झहीर खानचा विक्रमही मोडला आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा पाचवा गोलंदाज बनला. एवढेच नाही तर जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6000 धावा आणि 600 विकेट्स घेणारा पहिला भारतीय खेळाडू बनला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज
- अनिल कुंबळे 953 विकेट्स
- रविचंद्रन अश्विन 765 विकेट्स
- हरभजन सिंग 707 विकेट्स
- कपिल देव 687 विकेट्स
- रवींद्र जडेजा 600 विकेट्स
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड 47.4 षटकांत सर्वबाद 248 (सॉल्ट 43, डकेट 32, बटलर 52, बेथेल 51, राणा व जडेजा प्रत्येकी तीन बळी). भारत 38.4 षटकांत 6 बाद 251 (शुभमन गिल 87, श्रेयस अय्यर 59, अक्षर पटेल 52, आदिल रशीद व मेहमुद प्रत्येकी दोन बळी).