For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टीम इंडियाची विजयी हॅटट्रिक

06:55 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
टीम इंडियाची विजयी हॅटट्रिक
Advertisement

अमेरिकेला नमवत सुपर-8 मध्ये प्रवेश : सामनावीर अर्शदीपचे 9 धावांत 4 बळी, सुर्यकुमारचे नाबाद अर्धशतक

Advertisement

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सलग तिसऱ्या विजयासह सुपर-8 मध्ये प्रवेश केला. बुधवारी झालेल्या लढतीत भारताने अमेरिकेला 7 गड्यांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना अर्शदीप सिंगच्या भेदक माऱ्यासमोर अमेरिकेला 8 बाद 110 धावा करता आल्या. यानंतर विजयासाठीचे लक्ष्य टीम इंडियाने 18.2 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. टी 20 वर्ल्डकपमध्ये सुपर-8 मध्ये दाखल होणारा भारत तिसरा संघ ठरला आहे. आता, भारतीय संघाचा गटातील शेवटचा सामना दि. 15 जून रोजी कॅनडाविरुद्ध होईल. अमेरिकेच्या 111 धावांचा पाठलाग करताना एकवेळ भारतीय संघाने 39 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. यानंतर सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांनी लढाऊपणा दाखवत अमेरिकेचा पराभव केला. सूर्याने टी-20 विश्वचषकातील चौथे अर्धशतकही झळकावले. या सामन्यात सूर्याने 49 चेंडूत नाबाद 50 तर दुबेने 35 चेंडूत नाबाद 31 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. सूर्या आणि शिवम यांनी चौथ्या विकेटसाठी 65 चेंडूत 67 धावांची नाबाद भागीदारी केली. भारतीय संघ अडचणीत असताना या दोघांनी संयमी फलंदाजी करत विजयावर मोहोर उमटवली. याशिवाय ऋषभ पंतने 18 आणि रोहित शर्माने 3 धावा केल्या. तर विराट कोहलीला खातेही उघडता आले नाही. अमेरिकेकडून सौरभ नेत्रावलकरने 2 आणि अली खानने 1 बळी घेतला.

Advertisement

अर्शदीपची भेदक गोलंदाजी

न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या अमेरिकेची सुरुवात चांगली झाली नाही आणि पहिल्याच षटकात संघाने 2 गडी गमावले. यामुळे संघ दडपणाखाली आला आणि पॉवरप्लेमध्ये त्यांना केवळ 18  धावा करता आल्या. मात्र, यानंतर स्टीव्हन टेलर आणि नितीश कुमार यांनी चांगली फलंदाजी केल्यामुळे संघाची धावसंख्या 100 च्या पुढे जाऊ शकली. अमेरिकेकडून नितीश कुमारने 23 चेंडूंत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने सर्वाधिक 27 धावा केल्या तर टेलरने 30 चेंडूंत 2 षटकारांच्या मदतीने 24 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांनी मात्र सपशेल निराशा केल्याने अमेरिकन संघाला 20 षटकांत 8 बाद 110 धावापर्यंतच मजल मारता आली. भारताकडून वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने पहिल्या चेंडूपासूनच अप्रतिम गोलंदाजी करत अमेरिकेच्या फलंदाजांवर दडपण आणले. अर्शदीपने 4 षटकात केवळ 9 धावा देत 4 बळी घेतले. याशिवाय हार्दिक पंड्याने 2 आणि अक्षर पटेलने 1 विकेट घेतली.

संक्षिप्त धावफलक

अमेरिका 20 षटकांत 8 बाद 110 (स्टीव्हन टेलर 24, अॅरॉन जोन्स 11, नितीश कुमार 27, कोरी अँडरसन 15, हरमीत सिंग 10, अर्शदीप सिंग 4 बळी तर हार्दिक पंड्या 2, अक्षर पटेल 1 बळी). भारत 18.2 षटकांत 3 बाद 111 (रोहित शर्मा 3, विराट कोहली 0, रिषभ पंत 18 सुर्यकुमार यादव 49 चेंडूत 2 चौकार व 2 षटकारासह नाबाद 50, शिवम दुबे 35 चेंडूत नाबाद 31 )

मोहम्मद सिराजचे जादुई क्षेत्ररक्षण

अमेरिकेविरुद्ध लढतीत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे जादुई क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. सिराजने अप्रतिम क्षेत्ररक्षण करत अमेरिकेचा फलंदाज नितीश कुमारचा अप्रतिम झेल घेतला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमेरिकेचा फलंदाज नितीश कुमारने अर्शदीप सिंगच्या चेंडूवर मिड-विकेटवर पुल शॉट मारला. चेंडू सीमारेषेबाहेर षटकारासाठी जात होता, पण तिथे उपस्थित असलेल्या सिराजने हवेत झेप घेत अविश्वसनीय झेल घेतला.

अर्शदीपचा अनोखा विक्रम

अर्शदीप सिंग यंदाच्या वर्ल्डकपमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. अमेरिकेविरुद्ध त्याने अवघ्या 9 धावांत 4 बळी घेण्याची किमया केली. या शानदार कामगिरीच्या जोरावर अर्शदीप सिंगने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अर्शदीप सिंग टी-20 वर्ल्डकपमध्ये पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. अशी कामगिरी कोणत्याही भारतीय गोलंदाजाला करता आलेली नाही. जागतिक गोलंदाजीमध्ये बांगलादेशच्या मश्रफी मुर्तजा, अफगाणिस्तानचा शापुर झद्रान व नामिबियाच्या रुबेन ट्रम्पलमन यांनी अशी कामगिरी केली आहे. आता, या यादीत भारताचा अर्शदीप सामील झाला आहे.

स्टॉप क्लॉक नियमाचा अमेरिकेला फटका

टीम इंडियाच्या डावाच्या 15 व्या ओव्हरनंतर पंचांनी अमेरिकन संघावर 5 रन्सचा पेनल्टी ठोठावला. विशेष म्हणजे, अमेरिकेला हा दंड स्टॉप क्लॉक नियमानुसार करण्यात आला. नियमांनुसार, जर गोलंदाज संघ मागील षटक पूर्ण झाल्यानंतर 60 सेकंदात पुढील षटक टाकण्यास तयार नसेल, तर डावात तिसऱ्यांदा असे घडल्यास 5 धावांचा दंड आकारला जातो. पंचांनी अमेरिकन संघाला दोनदा ताकीद दिली होती आणि त्यानंतर ही कारवाई केली. स्टॉप क्लॉक निर्णयाचा टीम इंडियाला चांगलाच फायदा झाला.

Advertisement
Tags :

.