टीम इंडियाचा ‘सुपर’हिट शो
झिम्बाब्वेवर एकतर्फी मात : सुपर -8 मध्ये भारताने गुणाचे खाते उघडले : 72 धावांनी विजय
वृत्तसंस्था/ चेन्नई
येथील चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा पराभव करत स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले आहे. या विजयामुळे भारताने केवळ गुणतालिकेत आपले खाते उघडले नाही, तर सेमी-फायनलच्या शर्यतीत स्वत:ला कायम ठेवले आहे. आता सर्व नजरा 1 मार्चला होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्ध महामुकाबल्यावर असतील.
अभिषेक शर्मा (55) आणि हार्दिक पंड्या (नाबाद 50), तिलक वर्मा (16 चेंडूत नाबाद 44) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 20 षटकांत चार गडी गमावून 256 धावा केल्या. प्रत्युत्तरात, झिम्बाब्वेचा संघ निर्धारित षटकांत 6 गडी गमावून केवळ 184 धावाच करू शकला. त्यांच्याकडून ब्रायन बेनेटने एकाकी लढत देत 97 धावांची नाबाद खेळी केली, पण त्याला इतर फलंदाजांची अपेक्षित साथ मिळाली नाही. दरम्यान, भारताने झिम्बाब्वेला 72 धावांनी हरवून उपांत्य फेरीच्या दिशेने एक मजबूत पाऊल टाकले आहे. विशेष म्हणजे, टीम इंडियाने टी- 20 वर्ल्डकपमधील आपली सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. याआधी 2007 मध्ये भारताने इंग्लंडविरुद्ध 218 धावा केल्या होत्या.

हार्दिक-अभिषेकचा जलवा
झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. भारतीय फलंदाजांनी झिम्बाब्वेविरुद्ध आपला दम दाखवला. अभिषेक शर्माने या संधीचे सोने करताना खराब फॉर्मवर अखेर मात दिली. त्याने 30 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकारांसह 55 धावा केल्या. संजू सॅमसन (15 चेंडूत 24), इशान किशन (24 चेंडूत 38) व सूर्यकुमार यादव (13 चेंडूत 33) यांनीही दमदार खेळी साकारत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. यानंतर तिलक वर्मा व हार्दिक पंड्या या जोडीने धावांचा पाऊस पाडला आणि 31 चेंडूंत 84 धावांची भागीदारी करून संघाला 4 बाद 256 धावांपर्यंत पोहोचवले. हार्दिकने शेवटच्या दोन चेंडूंवर षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केले. त्याने 23 चेंडूंत 2 चौकार व 4 षटकारांसह 50 धावा केल्या, तर तिलक 16 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकारांसह 44 धावांवर नाबाद राहिला.
बेनेटची झुंज अपयशी
धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरुवात चांगली झाली, मात्र ती अपेक्षेपेक्षा संथ गतीने झाली. ब्रायन बेनेट आणि तादिवानाशे मारुमनी यांनी पहिल्या विकेटसाठी 6.2 षटकांत 44 धावांची भागीदारी उभी केली. मात्र अक्षर पटेलने मारुमनीला 20 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर वरुण चक्रवर्तीने डियोन मायर्सला अवघ्या 6 धावांवर माघारी धाडत झिम्बाब्वेला आणखी एक धक्का दिला. या दोन झटक्यांनंतर कर्णधार सिकंदर रझा आणि ब्रायन बेनेट यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 72 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. रझाने 2 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 21 चेंडूत 31 धावांचे योगदान दिले. ब्रायन बेनेट एकटा नडला, पण संघांचा पराभव तो टाळू शकला नाही. ब्रायन बेनेट 58 चेंडूंत 7 चौकार व 6 षटकारांसह 97 धावांवर नाबाद राहिला. झिम्बाब्वेला 6 बाद 184 धावापर्यंतच मजल मारता आली.
संक्षिप्त धावफलक
भारत 20 षटकांत 4 बाद 256 (संजू सॅमसन 24, अभिषेक शर्मा 30 चेंडूत 55, इशान किशन 38, सूर्यकुमार यादव 13 चेंडूत 33, हार्दिक पंड्या 23 चेंडूत नाबाद 50, तिलक वर्मा 16 चेंडूत नाबाद 44, नगारावा, मुझाराबानी, मापोसा आणि सिकंदर रझा प्रत्येकी 1 बळी)
झिम्बाब्वे 20 षटकांत 6 बाद 184 (ब्रायन बेनेट 59 चेंडूत नाबाद 97, मारुमनी 20, सिकंदर रझा 31, अर्शदीप सिंग 24 धावांत 3 बळी, वरुण, अक्षर पटेल आणि शिवम दुबे प्रत्येकी 1 बळी).
वेस्ट इंडिजविरुद्ध निर्णायक लढत
आफ्रिकेविरूद्ध सामना गमावल्यानंतर भारतीय संघाने झिम्बाब्वेविरूद्ध मोठ्या विजयाची नोंद केली. त्यामुळे भारतीय संघाकडे सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी कायम आहे. भारतीय संघाचा सुपर एट फेरीतील पुढील सामना दि. 1 मार्च रोजी वेस्ट इंडिजविरूद्ध होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी नॉकआऊट सामना असणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल, तो सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे. या सामन्यात नेट रनरेट महत्त्वाचा नसेल, केवळ सामना जिंकून भारतीय संघ सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित करू शकतो.
भारताची टी-20 वर्ल्डकपची दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या
2026च्या टी-20 वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा स्कोर सुरुवातीला वेस्ट इंडिजच्या नावावर होता. वेस्ट इंडिज संघाने झिम्बाब्वेविरुद्ध 254 धावा चोपून हा विक्रम केला होता. मात्र आता त्याच झिम्बाब्वेविरुद्ध भारतीय संघाने 256 धावा ठोकत नवा इतिहास घडवला आहे. मात्र टी-20 वर्ल्ड कपच्या एकूण इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या अजूनही श्रीलंकन संघाच्या नावावर कायम आहे. 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेने केनियाविरुद्ध तब्बल 260 धावा केल्या होत्या. भारत हा जागतिक विक्रम मोडण्यापासून अवघ्या 4 धावांनी दूर राहिला.
टी-20 वर्ल्ड कप इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या
260 धावा - श्रीलंका (वि केनिया), 2007
256 धावा - भारत (वि झिम्बाब्वे), 2026
254 धावा - वेस्ट इंडिज (वि झिम्बाब्वे), 2026
235 धावा - आयर्लंड (वि ओमान), 2016.