For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अहमदाबादमध्ये टीम इंडियाचा फुसका बार

06:55 AM Feb 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
अहमदाबादमध्ये टीम इंडियाचा फुसका बार
Advertisement

  आफ्रिकेकडून भारत 76 धावांनी पराभूत : सामनावीर डेव्हिड मिलरची 35 चेंडूत 63 धावांची खेळी

Advertisement

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर- 8 च्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 76 धावांनी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेने टीम इंडियासमोर 188 धावांचे लक्ष्य ठेवले होते. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ 18.5 षटकांत 111 धावांत ऑलआऊट झाला. या पराभवासोबतच भारताची सेमीफायनलची वाट बिकट झाली आहे. उर्वरित दोन्ही सामन्यात टीम इंडियाला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.

Advertisement

188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. पॉवरप्लेच्या 6 षटकाअखेर भारताने 31 धावांवर आपले 3 महत्त्वाचे फलंदाज गमावले आहेत. सलामीवीर ईशान किशनला भोपळाही फोडता आला नाही. तर तिलक वर्मा (1) आणि अभिषेक शर्मा (15) हे देखील झटपट माघारी परतले. त्यानंतर या पाठोपाठ वॉशिंग्टन सुंदरदेखील बाद झाला असून त्याने 11 चेंडूत 11 धावा केल्या. कर्णधार सूर्यालाही फार मोठी खेळी साकारता आली नाही. अखेरच्या षटकात शिवम दुबेने केलेल्या फटकेबाजीशिवाय अन्य एकालाही मैदानात तग धरता आला नाही. भारतीय संघ 18.5 षटकात 111 धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 76 धावांनी सामना जिंकत सेमी फायनलचा आपला मार्ग सुकर केला आहे.

आफ्रिकेचा दणकेबाज विजय

नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. डावाच्या पहिल्याच षटकात जसप्रीत बुमराहने आफ्रिकेला जोरदार धक्का दिला. संघाचा हुकमी एक्का क्विंटन डी कॉक अवघ्या 6 धावांवर माघारी परतला. बुमराहच्या या धक्क्यातून सावरण्याआधीच अर्शदीप सिंगनेही कर्णधार मार्करमला केवळ 4 धावांवर बाद केले, त्याचा हार्दिक पांड्याने झेल टिपला. यावरच थांबायचे नाही, तर बुमराहने रायन रिकेल्टनलाही 7 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अवघ्या 20 धावांत तीन प्रमुख फलंदाज बाद झाल्याने आफ्रिकन संघ संकटात सापडला होता.

ब्रेव्हिस-मिलरचे वादळ, स्टब्सचीही फटकेबाजी

जेव्हा आफ्रिका संकटात होती, तेव्हा डेवाल्ड ब्रेव्हिस आणि डेव्हिड मिलर यांनी भारतीय गोलंदाजांची चांगली धूलाई केली आणि चौथ्या विकेटसाठी तब्बल 97 धावांची भागीदारी केली. ब्रेव्हिसने 45 धावा केल्या, पण मोक्याच्या क्षणी शिवम दुबेच्या गोलंदाजीवर अभिषेकने त्याचा अफलातून झेल टिपला आणि ही जोडी फुटली. त्याने 29 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 45 धावांचे योगदान दिले. यानंतर वरुण चक्रवर्तीने मिलरच्या किलर खेळीला ब्रेक लावला. त्याने 35 चेंडूत 7 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 63 धावांची खेळी केली. अखेरच्या चार षटकांत ट्रिस्टन स्टब्सने 24 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 44 धावांची खेळी करत संघाच्या धावफलकावर 187 धावा लावल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने तीन, तर अर्शदीप सिंगने दोन विकेट घेतल्या. वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण आफ्रिका 20 षटकांत 7 बाद 187 (डेवाल्ड ब्रेविस 45, ट्रिस्टन स्टब्ज नाबाद 44, डेव्हिड मिलर 35 चेंडूत 63, जसप्रीत बुमराह 15 धावांत 3 बळी, अर्शदीप सिंग 2 बळी, वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबे प्रत्येकी 1 बळी)

भारत 18.5 षटकांत सर्वबाद 111 (अभिषेक शर्मा 15, सूर्यकुमार यादव 18, सुंदर 11, शिवम दुबे 37 चेंडूत 42, हार्दिक पंड्या 18, जॅन्सेन 22 धावांत 4 बळी, केशव महाराज 3 बळी, बॉश 2 बळी).

Advertisement
Tags :

.