टीम इंडियाचा पडद्यामागचा हिरो
रविवारी द.आफ्रिकेला नमवत वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे. अर्थात, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांची तगडी मधली फळी असल्यामुळे मुझुमदार यांना टीम इंडियामध्ये फारसे स्थान मिळाले नाही. पण, याचा फारसा गवगवा त्यांनी कधी केला नाही. संधी मिळाली की त्याचे सोने होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमोल मुझुमदार. मुझुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिलांनी अतुलनीय, अविस्मरणीय अशी कामगिरी करत जेतेपदाला गवसणी घातली. भारतीय संघासाठी खेळता न आले तरी त्यांनी देशांतर्गत क्रिकेट आणि प्रशिक्षक म्हणून भारतीय क्रिकेटला मोठे योगदान दिले आहे. सोशल मीडियावर मुझुमदार यांचा फोटो शेअर करत खाली चक दे इंडिया या सिनेमातील शाहरुख खानचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत, क्रिकेटमध्ये आयुष्य वेचणारे, कधीही भारतीय कॅप न घालणारे, तरीही महिला विश्वचषक जिंकणारे प्रशिक्षक म्हणून उदयास आलेले अमोल मुझुमदार रणजीचे दिग्गज... टीम इंडियाचे कबीर खान अशा आशयाची कॅप्शन दिली आहे.
अमोल मुझुमदार हे भारतीय क्रिकेटचे असे नाव आहे ज्याला या खेळाचा चाहता, प्रत्येक माणूस ओळखतो. रणजी क्रिकेटमध्ये धावांचा ढिग लावूनही ते कधीही भारतासाठी आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकले नाहीत. विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न त्यांना खेळाडू म्हणून पूर्ण करता आले नसले तरी कोच बनून त्यांनी जे केले ते महिला क्रिकेट विश्वात सुवर्णक्षरांनी नोंदवले जाईल.