टीम इंडियाने जिंकली ऑस्ट्रेलियात मालिका
तिसऱ्या टी 20 सामन्यात भारतीय महिलांचा 17 धावांनी विजय : सामनावीर स्मृती मानधनाची 82 धावांची खेळी
वृत्तसंस्था/ अॅडलेड
सामनावीर स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज या जोडगोळीच्या शानदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर तिसऱ्या टी 20 सामन्यात 17 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियासमोर 177 धावांचे टार्गेट ठेवले होते. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाला 159 धावापर्यंत मजल मारता आली. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियन मैदानात भारतीय संघाने जिंकलेली ही फक्त दुसरी द्विपक्षीय मालिका ठरली.
भारतीय महिलांनी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी टीम इंडियाच्या डावाची सुरुवात केली. पण, शेफालीला 7 धावांवर किम गर्थने बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिले यश मिळवून दिले. यानंतर स्मृती आणि जेमिमा रॉड्रिग्जने शतकी भागीदारी साकारत संघाचा डाव सावरला. या जोडीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. स्मृतीने 55 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 82 धावांची दमदार खेळी केली. तिच्याशिवाय जेमिमा रॉड्रिग्जने 46 चेंडूत 4 चौकाराच्या मदतीने 59 धावांचे योगदान दिले. ही जोडी बाद झाल्यानंतर रिचा घोषने 7 चेंडूत 18 धावा फटकावल्या. या जोरावर टीम इंडियाने 20 षटकांत 6 बाद 176 धावा जमवल्या.
मायदेशातच ऑस्ट्रेलियाने गमावली मालिका
भारतीय संघाने दिलेल्या 177 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. श्रेयंका पाटीलने दुसऱ्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर भारतीय संघाला जॉर्जिया वॉलच्या रुपात पहिले यश मिळवून दिले. रेणूका सिंहने बेथ मूनीला अवघ्या 6 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. एलिसा पेरीच्या रुपात श्रेयंकाने संघासाठी तिसरे यश मिळवत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले. संघाला धक्क्यावर धक्के बसत असताना अॅश्ले गार्डनरने 57 धावांची खेळी महत्वपूर्ण खेळी साकारली. पण अरुंधती रे•ाrने 57 धावांवर तिच्या खेळीला ब्रेक लावत भारतीय संघाच्या मालिका विजयातील मोठा अडथळा दूर केला. ती परतल्यावर इतर ऑसी खेळाडूंनी सपशेल निराशा केली. यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ निर्धारित 9 विकेट्सच्या मोबदल्यात 159 धावांपर्यंतच मजल मारू शकला.
संक्षिप्त धावफलक
भारतीय महिला संघ 20 षटकांत 6 बाद 176 (स्मृती मानधना 82, शेफाली वर्मा 7, जेमिमा रॉड्रिग्ज 59, रिचा घोष 18, अनाबेल 2 बळी, किम गर्थ आणि मोलिनिक्स प्रत्येकी 1 बळी)
ऑस्ट्रेलियन महिला संघ 20 षटकांत 9 बाद 159 (लिचफिल्ड 26, अॅश्ले गार्डनर 57, अनाबेल सदरलँड 14, श्रेयंका पाटील आणि श्री चरणी प्रत्येकी 3 बळी, अरुधंती रे•ाr 2 बळी).
अखेर 10 वर्षांचा दुष्काळ संपला
भारतीय संघाने 2016 मध्ये मिताली राजच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानात 2-1 असा मालिका विजयाचा डाव साधला होता. यानंतर 10 वर्षांचा दुष्काळ संपवत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन मैदानात नवा इतिहास रचला आहे.