For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुसरी कसोटी जिंकत टीम इंडियाची मालिकेत बरोबरी

06:59 AM Feb 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
दुसरी कसोटी जिंकत टीम इंडियाची मालिकेत बरोबरी
Advertisement

इंग्लंडवर 106 धावांनी दणदणीत विजय : सामनावीर बुमराहचे 9 बळी : अश्विनचाही प्रभावी मारा

Advertisement

वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम

फलंदाज आणि गोलंदाजांच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत 106 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने 5 सामन्यांच्या कसोटीत 1-1 अशी बरोबरी केली. इंग्लंडने पहिल्या कसोटीत विजय साकारला होता, आता भारताने विजय मिळवत बरोबरी केली आहे. उभय संघातील तिसरी कसोटी दि, 15 फेब्रुवारीपासून राजकोट येथे खेळवली जाईल. भारताने पहिल्या डावात यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर 396 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा डाव 253 धावांवर आटोपला. यामुळे टीम इंडियाला 143 धावांची आघाडी मिळाली. यानंतर भारताने दुसऱ्या डावात शुभमन गिलच्या शतकी खेळीच्या जोरावर 255 धावा केल्या व इंग्लंडसमोर विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 292 धावांवर आटोपला. इंग्लंडसाठी झॅक क्रॉलीने सर्वाधिक 73 धावांचे योगदान दिले. भारताकडून दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह आणि आर. अश्विनने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. बुमराहने या सामन्यात एकूण 9 विकेट घेतल्या. या कामगिरीच्या जोरावर त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

Advertisement

साहेबांची सपशेल शरणागती, बुमराह-अश्विनची प्रभावी कामगिरी

दरम्यान, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन म्हणाला होता, की त्यांचा संघ 60-70 षटकात 399 धावांचे लक्ष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, पण प्रत्यक्षात ते 300 धावा देखील करू शकले नाहीत. इंग्लंडला या सामन्यात विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य मिळाले होते. तिस्रया दिवसअखेर इंग्लंडची धावसंख्या 1 बाद 67 होती. पण चौथ्या दिवशी दुसरे सत्र संपण्याआधी इंग्लंड संघाला 106 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. चौथ्या दिवशी नाईटवॉचमन रेहान अहमदच्या (23) रुपाने पहिला विकेट पडली. अक्षर पटेलने त्याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. यानंतर अश्विनने ऑली पोप आणि जो रुटला बाद करत इंग्लंडला बॅकफूटवर आणले. पोपने 23 तर रुटने 16 धावा केल्या. यानंतर 42 व्या षटकांत कुलदीप यादवने जॅक क्रॉलीला बाद करत इंग्लंडला मोठा धक्का बसला. क्रॉलीने सर्वाधिक 73 धावांचे योगदान दिले. पहिल्या डावातही त्याने 76 धावांची खेळी साकारली होती. क्रॉली बाद झाल्यानंतर यानंतर लगेच बुमराहने जॉनी बेअरस्टोला तंबूचा रस्ता दाखवला. बेअरस्टोला त्याने 26 धावांवर पायचीत केले. तर लंचनंतर बेन स्टोक्स श्रेयसच्या थ्रोवर धावबाद झाला. अवघ्या 220 धावांवर 7 विकेट पडल्यानंतर बेन फॉक्स आणि टॉम हार्टले यांनी 55 धावांची भागीदारी करत थोडा प्रतिकार केला. बुमराहने फॉक्सला बाद करत ही भागीदारी तोडली. फॉक्सने 36 धावा फटकावल्या. शोएब बशीरला मुकेश कुमारने भोपळाही फोडू दिला नाही. बुमराहने हार्टलेला बोल्ड करत इंग्लंडचा डाव 292 धावांवर संपवला. विशेष म्हणजे, विजयी आव्हानाचा पाठलाग करताना जॅक क्रॉली वगळता इतर इंग्लिश फलंदाजांनी मात्र सपशेल निराशा केली.

संक्षिप्त धावफलक

भारत प.डाव 396 व दु.डाव 255

इंग्लंड प.डाव 253 व दुसरा डाव 69.2 षटकांत सर्वबाद 292 (जॅक क्रॉली 73, बेन डकेट 28, बेन फॉक्स 36, हार्टले 36, अश्विन व बुमराह प्रत्येकी तीन बळी, मुकेश कुमार, कुलदीप व अक्षर पटेल प्रत्येकी एक बळी).

अश्विनचा आणखी एक विक्रम

दुसऱ्या कसोटीत अनुभवी फिरकीपटू अश्विनने तीन बळी घेत आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. यादरम्यान अश्विन इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला. त्याने भागवत चंद्रशेखर यांचा विक्रम मागे टाकला. आता, इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीत अश्विन पहिल्या स्थानी आहे. याशिवाय, अश्विन याआधी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज होता. आता या यादीत इंग्लंड संघ नव्याने सामील झाला आहे.

इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक कसोटी बळी घेणारे गोलंदाज

  1. 97 - रविचंद्रन अश्विन
  2. 95 - भागवत चंद्रशेखर
  3. 92 - अनिल कुंबळे
  4. 85 - बिशन सिंग बेदी
  5. 85 - कपिल देव
  6. 67 - इशांत शर्मा.

फक्त 0.45 सेकंद, कर्णधार रोहितचा नेत्रदीपक झेल

पहिल्या कसोटीत इंग्लंडसाठी हिरो ठरलेल्या ओली पोपला दुसऱ्या कसोटीच्या दुस्रया डावात 23 धावा करता आल्या. अश्विनने पोपला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पोपचा कॅच कर्णधार रोहित शर्माने घेतला जो सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. अश्विनच्या गोलंदाजीवर पोपने कट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू थोडासा उसळला आणि पोपच्या बॅटला लागून हवेत स्लीपच्या दिशेने गेला. रोहितने कोणतीही चूक न करता अचूक झेल टिपला. विशेष म्हणजे रोहितने एका सेकंदापेक्षा (0.45 सेकंद) कमी रिअॅक्शन टाइममध्ये पोपचा झेल घेतला. रोहितने जेव्हा हा झेल घेतला तेव्हा ओली पोपचाही यावर विश्वास बसत नव्हता. या अप्रतिम झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत दुसऱ्या स्थानी

विशाखापट्टणम कसोटीमध्ये टीम इंडियाने इंग्लंडचा 106 धावांनी धुव्वा उडवला. इंग्लंडविरुद्ध या विजयामुळे भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडिया पाचव्या नंबरवर होती. मात्र, या विजयामुळे रोहित ब्रिगेडने गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. गुणतालिकेत ऑस्ट्रेलियन संघ अव्वलस्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ तिसऱ्या स्थानी असून न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आहे.

दुसऱ्या कसोटीतील विजयानंतर रोहित आनंदी

इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत विराट कोहली, केएल राहुल आणि रविंद्र जडेजा या तीन महत्वाचे खेळाडू खेळत नव्हते. अशात कर्णधार रोहित शर्मा युवा खेळाडूसह विशाखापट्टणमच्या स्टेडियमवर उतरला. इंग्लंडच्या तुलनेत भारतीय संघाकडे अनुभव कमी होता. पण निकाल तरीही भारताच्याच बाजूने लागला. कर्णधारासह प्रत्येकासाठी युवा खेळाडूंनी मिळवलेला हा विजय महत्वाचा ठरला. हा सामना जिंकल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, जसप्रीत बुमराहने या सामन्यात अप्रतिम मारा केला. त्याची गोलंदाजी ही नजरेचे पारणे फेडणारी होती. बुमराह हा आमच्यासाठी चॅम्पियनच आहे. याशिवाय, या सामन्यात यशस्वी जैस्वाल, अश्विन व शुभमन गिलने दमदार कामगिरी केली. तिसऱ्या कसोटीतही आम्ही विजय मिळवण्याच्या निर्धारानेच उतरु, असा विश्वासही त्याने यावेळी व्यक्त केला.

Advertisement
Tags :

.