For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टीम इंडियाने कसोटीतील पराभवाचा काढला वचपा

06:59 AM Dec 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
टीम इंडियाने कसोटीतील पराभवाचा काढला वचपा
Advertisement

द.आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकाविजय : तिसऱ्या सामन्यात 9 गड्यांनी विजय : मालिकेत 2-1 ने यश

Advertisement

वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम

कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेकडून 0-2 अशी हार पत्कारावी लागल्यानंत टीम इंडियाने वनडे मालिकेत जबरदस्त पुनरागमन करत पराभवाचा वचपा काढला. भारतीय संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-1 असा विजय मिळवत मालिका खिशात घातली. विशाखापट्टणम येथे झालेल्या निर्णायक तिसऱ्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेटने धुव्वा उडवला. विशेष म्हणजे, तब्बल नऊ महिन्यांच्या अंतरानंतर भारतातील मैदानात खेळताना रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी ही वनडे मालिका अत्यंत संस्मरणीय ठरली.

Advertisement

प्रारंभी, डॉ. वाय. एस. राजशेखर रे•ाr स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात क्विंटन डी कॉकने शतकी खेळीच्या जोरावर आफ्रिकेने 270 धावा केल्या. यानंतर विजयासाठीचे लक्ष्य भारतीय संघाने 9 विकेट्स आणि 61 चेंडू राखून विजय मिळवला. यशस्वी जैस्वालचे नाबाद शतक आणि रोहित शर्मा, विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने अगदी सहज विजयाला गवसणी घातली. आता, उभय संघात पाच सामन्यांची टी-20 मालिका 9 डिसेंबरपासून सुरू होईल.

जैस्वालचे पहिले शतक, रोहित-विराटचाही जलवा

271 धावांच्या लक्ष्याचा सामना करताना, यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांनी भारताला धमाकेदार सुरुवात करुन दिली. दोघांनीही आफ्रिकन गोलंदाजांची धुलाई करताना 155 धावांची भागीदारी केली. रोहितनेही नेहमीच्या आक्रमक अंदाजात खेळताना 73 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारासह 75 धावा फटकावल्या. शतकाच्या दिशेने वाटचाल करत असताना त्याला केशव महाराजने बाद केले. या मालिकेतील त्याचे हे दुसरे अर्धशतक ठरले. यानंतर यशस्वीने 111 चेंडूत त्याचे पहिले एकदिवसीय शतक झळकावले. त्याने 121 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारासह नाबाद 116 धावा केल्या. विराट कोहलीनेही आक्रमक खेळताना अवघ्या 45 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारासह नाबाद 65 धावांचे योगदान दिले. या दोघांत शतकी भागीदारी झाली आणि दोघांनीही 40 व्या षटकात संघाला दणकेबाज विजय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेसाठी केशव महाराजने एकमेव विकेट घेतली.

वनडे मालिकेत आफ्रिकेच्या पदरी निराशा

टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉक आणि रायन रिकेल्टन यांनी डावाची सुरुवात केली. पण पहिल्याच षटकात अर्शदीप सिंगने रिकेल्टनला भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर डी कॉकला कर्णधार टेंबा बावुमाने चांगली साथ दिली. या दोघांत 113 धावांची महत्वपूर्ण भागीदारी झाली. ही जोडी जमलेली असतानाच बावुमाला जडेजाने 48 धावांवर माघारी पाठवले. बावुमा बाद झाल्यानंतरही मॅथ्यू ब्रिट्झकेने डी कॉकला साथ देत अर्धशतकी भागीदारी करत संघाला 150 धावांचा टप्पा पार करून दिला. पण या सामन्यात ब्रिट्झकेला फार काळ प्रसिद्ध कृष्णाने टिकू दिले नाही. 29 व्या षटकात त्याला 24 धावांवर प्रसिद्धने पायचीत केले. याच षटकात मागील सामन्यात शतक करणाऱ्या एडेन मार्करमचा अडथळाही प्रसिद्धने दूर केला.

डिकॉकची शतकी खेळी वाया

यानंतर डेवाल्ड ब्रेव्हिस मैदानात आला. यावेळी डी कॉक शतकाच्या जवळ होता. अखेर त्याने 30 व्या षटकात हर्षित राणाच्या गोलंदाजीवर षटकारासह शतक पूर्ण केले. मात्र शतकानंतर त्याला प्रसिद्ध कृष्णानेच त्रिफळाचीत केले. डी कॉकने 89 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकारांसह सर्वाधिक 106 धावांचे योगदान दिले. तो बाद झाल्यानंतर मात्र दक्षिण आफ्रिकेची धावगती मंदावली. ब्रेव्हिस आणि जॅन्सेन स्वस्तात बाद झाले. कुलदीपने कॉर्बिन बॉशलाही टिकू दिले नाही. त्याला 9 धावांवर स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेत बाद केले. लुंगी एनगिडी, बार्टमन सपशेल अपयशी ठरले. बार्टमन बाद झाल्यानंतर आफ्रिकन संघ 270 धावांत ऑलआऊट झाला. टीम इंडियाकडून प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 4 बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण आफ्रिका 47.5 षटकांत सर्वबाद 270 (डिकॉक 89 चेंडूत 106, टेंबा बावुमा 48, ब्रिट्झ 24, मॅरक्रम 1, ब्रेव्हिस 29, मार्को जॅन्सेन 17, पेशव महाराज नाबाद 20, प्रसिद्ध कृष्णा 66 धावांत 4 बळी, कुलदीप यादव 41 धावांत 4 बळी, अर्शदीप आणि जडेजा प्रत्येकी 1 बळी).

भारत (रोहित शर्मा 73 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारासह 75, यशस्वी जैस्वाल 121 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारासह नाबाद 116, विराट कोहली 45 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारासह नाबाद 65, केशव महाराज 1 बळी).

 

जैस्वालचे पहिले वनडे शतक

आफ्रिकेविरुद्ध अखेरच्या निर्णायक सामन्यात यशस्वी जैस्वालने आपले पहिले वाहिले वनडे शतक साजरे केले. पहिल्या दोन्ही वनडे सामन्यांमध्ये मोठी खेळी करण्यात अपयशी ठरलेल्या यशस्वी जैस्वालने तिसऱ्या वनडेत मात्र शतकापर्यंत मजल मारली. जैस्वालने 111 चेंडूंत शतक पूर्ण केलं आहे. शतक पूर्ण झाल्यानंतर त्याने विराटप्रमाणेच मैदानात उडी घेत सेलिब्रेट केले. आक्रमक सेलिब्रेशन करत यशस्वीने पुढे जाऊन विराटला मिठी मारली आणि यानंतर दोघांनीही मैदानावर डान्सच्या काही स्टेप केल्या. हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. दरम्यान, भारताकडून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक झळकवणारा यशस्वी जैस्वाल हा सहावा फलंदाज ठरला आहे. याआधी सुरेश रैना, रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल आणि शुभमन गिल यांनी तिन्ही प्रकारात शतक झळकवण्याचा पराक्रम करून दाखवला आहे. या यादीत आता यशस्वी जैस्वालचा समावेश झाला आहे.

Advertisement
Tags :

.