नव्या वर्षात टीम इंडियाचा विजयी श्रीगणेशा
पहिल्या वनडेत न्यूझीलंडवर 4 विकेट्सनी मात : कोहलीचे शतक हुकले, गिलचे अर्धशतक : मालिकेत 1-0 ने आघाडी
वृत्तसंस्था/ वडोदरा
विराट कोहली (93) आणि शुभमन गिलच्या (56) शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडचा 4 विकेट्सनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना किवीज संघाने 8 बाद 300 धावा केल्या. यानंतर विजयी लक्ष्य टीम इंडियाने 6 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. उभय संघातील दुसरा सामना दि. 14 रोजी राजकोट येथे होईल.
प्रारंभी, न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या 301 धावांचा पाठलाग करताना भारताला रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी दमदार सुरुवात करुन दिली. नेहमीप्रमाणे रोहितने आक्रमक शैलीत खेळताना 29 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारासह 26 धावा केल्या. पण, त्याला जेमिसनने बाद करत भारताला पहिला धक्का दिला. यानंतर कर्णधार गिल आणि विराटने शतकी भागीदारी करत विजयाचा पाया रचला. गिलने 71 चेंडूत 56 धावा केल्या आणि तो बाद झाला. विराटने देखील शानदार खेळी साकारताना 91 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकारासह 93 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. शतकाच्या उंबरठ्यावर असताना त्याला जेमिसनने बाद केले. विराट बाद झाल्यानंतर जडेजाही स्वस्तात बाद झाला. श्रेयस अय्यरने कमबॅक करताना 49 धावांचे योगदान दिले, पण तो अर्धशतक न पूर्ण करताच बाद झाला. यानंतर केएल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदरने संघाला विजय मिळवून दिला. केएल 21 चेंडूत 29 तर सुंदर 7 धावांवर नाबाद राहिला.
न्यूझीलंडचा पराभव, कॉनवे, निकोल्स, मिचेलची अर्धशतके वाया
या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवे आणि हेन्री निकोल्स यांनी संयमी सुरुवात केल्यानंतर काही मोठे शॉट्सही खेळले. या दोघांचे झेलही भारतीय क्षेत्ररक्षकांकडून सुटले, ज्याचा फायदा त्यांनी घेतला. या दोघांनीही अर्धशतके पूर्ण करण्यासोबतच शतकी भागीदारीही केली. न्यूझीलंडसाठी वनडेत भारताविरुद्ध भारतात शतकी भागीदारी करणारी त्यांची तिसरी सलामी जोडी ठरली. पण अखेर 22 व्या षटकात हर्षित राणाने निकोल्सला यष्टीरक्षक केएल राहुलच्या हातून झेलबाद करत भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला. निकोल्स 69 चेंडूत 62 धावांची खेळी केली. त्यानंतर 24 व्या षटकात राणाने कॉनवेलाही 67 चेंडूत 56 धावांवर त्रिफळाचीत केले.
मिचेलची 84 धावांची दमदार खेळी
सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर न्यूझीलंडने नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या. विल यंगला मोहम्मद सिराजने 12 धावांवर, तर ग्लेन फिलिप्सला कुलदीप यादवने 12 धावांवर बाद केले. मिचेल हे याला प्रसिद्ध कृष्णाने 18 धावांवर त्रिफळाचीत केले. दुसरीकडे, डॅरिल मिचेलने मात्र संयमी खेळी साकारली. त्याने मायकल ब्रेसवेलसोबत डाव पुढे नेला. मात्र ब्रेसवेलही 16 धावांवर श्रेयस अय्यरने केलेल्या डायरेक्ट थ्रोवर धावबाद झाला. यानंतर मोहम्मद सिराजने फोक्सलाही 1 धावेवर तंबूचा रस्ता दाखवला. पण, दुसरीकडे डॅरिल मिचेलने मात्र 71 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारासह 84 धावांची खेळी साकारली. पण अखेर मिचेलला शतकाच्या जवळ असताना 48 व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाने पायचीत केले. तो बाद झाल्यानंतर क्लार्क आणि काईल जेमिसन यांनी संघाला 50 षटकात 8 बाद 300 धावांपर्यंत पोहोचवले. क्लार्क 17 चेंडूत 24 तर काईल जेमिसन 8 धावांवर नाबाद राहिला.
न्यूझीलंड 50 षटकांत 8 बाद 300 (डेव्हॉन कॉनवे 56, हेन्री निकोल्स 62, विल यंग 12, डॅरिल मिचेल 84, ग्लेन फिलिप्स 12, मिचेल हे 18, ब्रेसवेल 16, क्लार्क 24, मोहम्मद सिराज, हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णा प्रत्येकी 2 बळी, कुलदीप यादव 1 बळी)
भारत 49 षटकांत 6 बाद 306 (रोहित शर्मा 26, शुभमन गिल 56, विराट कोहली 91 चेंडूत 93, श्रेयस अय्यर 49, रवींद्र जडेजा 4, हर्षित राणा 29, केएल राहुल नाबाद 29, वॉशिग्टंन सुंदर नाबाद 7, काईल जेमिसन 4 बळी, आदित्य अशोक आणि क्लार्क प्रत्येकी 1 बळी).
षटकारांचा बादशाह, रोहित शर्मा
रोहित शर्मा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि हिटमॅनमध्ये आपल्या फटकेबाजीच्या जोरावर अवघ्या काही चेंडूत सामन्याचा रोख बदलण्याची ताकद आहे. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात तो 26 धावा करत माघारी परतला. ज्यामध्ये त्याने दोन षटकार आणि तीन चौकार लगावले. या सामन्यात दोन षटकार लगावताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 650 षटकार पूर्ण केले आहेत आणि अशी अनोखी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज बनला आहे. याशिवाय, रोहित एकदिवसीय क्रिकेट इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा सलामीवीर फलंदाजही बनला आहे. त्याने ख्रिस गेलचा (328 षटकार) विक्रम मोडला. रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 329 षटकार मारले आहेत. विशेष म्हणजे, रोहितने वनडेत 357, टी 20 मध्ये 205 आणि कसोटीत 88 षटकार लगावले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारे सलामीवीर
रोहित शर्मा - 329 षटकार
ख्रिस गेल - 328 षटकार
सनथ जयसूर्या - 263 षटकार
मार्टिन गप्टिल - 174 षटकार
सचिन तेंडुलकर - 167 षटकार
कोहलीचे विराट रेकॉर्ड, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28 हजार धावा
न्यूझीलंडविरुद्ध लढतीत विराटने 25 धावा करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28,000 धावा पूर्ण केल्या. यासह त्याने सचिनचा विक्रम मोडून काढला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 28,000 धावांचा पल्ला गाठणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. या यादीत आतापर्यंत अव्वल असलेल्या सचिन तेंडुलकरने 644 डावात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28,000 धावांचा पल्ला गाठला होता तर कोहलीने 624 डावात 28,000 धावांचा डोंगर सर केला आहे.
किवीज फलंदाजांची ऐतिहासिक कामगिरी
न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात करताना हेन्री निकोल्स आणि कॉनवे या जोडीने पहिल्या विकेटसाठी 117 धावा जोडल्या. यासह या जोडीच्या नावे मोठा विक्रम नोंदवला गेला आहे. वनडे क्रिकेटमध्ये केवळ तिसऱ्यांदा असे घडले की, न्यूझीलंडच्या सलामी जोडीने भारतात वनडे सामना खेळताना 100 किंवा त्याहून अधिक धावांची भागीदारी केली आहे. या जोडीने 27 वर्षांनंतर पहिल्यांदाच शतकी केली. याआधी 1999 मध्ये नॅथन अॅसल आणि क्रेस स्पीयरमन या जोडीने डावाची सुरूवात करताना शतकी भागीदारी केली होती. त्याआधी 1988 मध्ये जॉन राईट आणि अँड्यू जोन्स या जोडीने शतकी भागीदारी केली होती.