टीम इंडिया ‘गाबा’त पलटवार करण्यासाठी सज्ज
नाणेफेक ठरणार निर्णायक : अश्विन, हर्षित राणाला डच्चू मिळण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ब्रिस्बेन
टीम इंडिया बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज झाली आहे. मालिकेतील हा सामना द गाबा, ब्रिस्बेन येथे खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात गाबात विजय मिळवून इतिहास घडवला होता. यामुळे चाहत्यांना पुन्हा एकदा अशाच विजयाची अपेक्षा असणार असेल. टीम इंडियाने या मालिकेत विजयी सुरुवात केली होती, मात्र ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभूत करत मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी उर्वरित तीनही सामने भारतीय संघासाठी महत्वपूर्ण आहेत. यामुळे टीम इंडिया गाबात पलटवार करण्याच्या तयारीने मैदानात उतरेल यात शंकाच नाही.
अॅडलेड येथील दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग खडतर झाला आहे. ब्रिस्बेन कसोटीत कमबॅक करण्यासाठी टॉप ऑर्डरमधील फलंदाजांवर मोठी जबाबदारी असेल. दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचे टॉप ऑर्डरमधील फलंदाज ढेर झाले होते. तसेच कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि ऋषभ पंत यासरख्या अनुभवी खेळाडूंनी निराशा केली होती. यामुळे तिसऱ्या टेस्टमध्ये या तिघांकडून धमाकेदार कामगिरीची अपेक्षा असेल. दुसरीकडे, आर.अश्विन व हर्षित राणा या दोघांना तिसऱ्या सामन्यात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. हर्षित ऐवजी आकाशदीप संघात स्थान मिळण्याचे संकेत आहेत.
रोहित-विराटकडे नजरा
विराटने पर्थमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात शतकी खेळी केली होती. या शतकासह त्याने अनेक महिन्यांची प्रतिक्षा संपवली होती. यामुळे विराटकडून दुसऱ्या सामन्यातही आशा वाढल्या होत्या. तर नियमित कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या सामन्यात खेळणार होता. अर्थात, या दोघांकडून भारताला मोठी आशा होती. मात्र अपवाद वगळता भारताचे फलंदाज ंसपशेल फ्लॉप ठरले. यामुळेच तिसऱ्याच दिवशी भारतीय संघाला 10 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला.
गाबाचा अभिमान पुन्हा मोडण्यासाठी सज्ज
भारतीय संघाने 2021 मध्ये ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची किमया साधली होती. ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजाराच्या जादुई खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा 3 गडी राखून पराभव केला. 32 वर्षांनंतर ब्रिस्बेनमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात कोणत्याही संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. आता गाबात 2021 ची पुनरावृत्ती करायची असेल, तर टीम इंडियाच्या फलंदाजांसह गोलंदाजांनाही आपली धार दाखवून द्यावी लागेल. यामुळे खऱ्या अर्थाने टीम इंडियाची ‘कसोटी’ असणार आहे.
भारतीय गोलंदाजांना गाबाच्या खेळपट्टीवर गोलंदाजी करण्याची संधी मिळते. तेव्हा त्यांनी चौथ्या आणि पाचव्या स्टंप लाईनवर अधिक अवलंबून रहावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संघाला गाबाच्या उसळीचा फायदा घ्यावा लागेल. विशेषत: भारतीय गोलंदाजांनी गाबाच्या बूमचा फायदा घ्यावा.
-माजी ऑस्ट्रेलियन सलामीवीर, मॅथ्यू हेडन