For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर

06:55 AM Aug 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर
Advertisement

 फॉलोऑननंतरही लंकन संघ संकटात : चौथ्या दिवसअखेरीस 6 बाद 229 धावा, 16 धावांची नाममात्र आघाडी

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलंबो

भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबोत सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे लवकर थांबवण्यात आला. कोलंबो टेस्टमध्ये चौथ्या दिवसअखेर भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. श्रीलंकेने फॉलोऑन मिळाल्यानंतर दुसऱ्या डावात 6 बाद 229 धावापर्यंत मजल मारली आहे. लंकेकडे आता 16 धावांची आघाडी असून आणि त्यांचे 4 विकेट्स बाकी आहेत. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सोनल दिनुशा 7 तर नुवांता 3 धावांवर खेळत होते. आता, कसोटीच्या शेवटच्या आणि पाचव्या दिवशी श्रीलंकेचा उरलेला डाव लवकर गुंडाळून विजयावर शिक्कामोर्तब करण्याची सुवर्णसंधी टीम इंडियाकडे असणार आहे.

Advertisement

भारताने आपला पहिला डाव 503/9 धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात, श्रीलंकेचा संघ 290 धावांवर सर्वबाद झाला आणि टीम इंडियाला 213 धावांची आघाडी मिळाली. चौथ्या दिवशी लंकन संघाने 8 बाद 265 धावांवरुन पुढे खेळायला सुरुवात केली. पण अवघ्या 15 धावांची भर घातल्यानंतर त्यांचा पहिला डाव 89.4 षटकांत 290 धावांत आटोपला. सोनल दिनुशाने सर्वाधिक 103 धावांची खेळी साकारली. याशिवाय, पासिंदूने 80 धावांचे योगदान दिले. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुथारने प्रत्येकी तीन बळी मिळवले. सारांश जैनने दोघांना तंबूचा रस्ता दाखवला.

फॉलोऑननंतर लंकेचा संघर्ष अन् पावसाची हजेरी

213 धावांची आघाडी घेत शुभमन गिलने यजमानांना फॉलोऑन दिला. श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजने लाहिरू उदाराची विकेट घेत टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. तो अवघ्या 3 धावा करून माघारी परतला. यानंतर रवींद्र जडेजाने कामिल मिशाराला 32 धावांवर बाद केले. मात्र, त्यानंतर पसिंदू सूरियाबंदरा आणि कामिंदू मेंडिसने संघाचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी साकारली. अखेर प्रसिद्ध कृष्णाने ही जोडी फोडली आणि कामिंदू मेंडिसला माघारी धाडले. त्याने 92 चेंडूत 55 धावा फटकावल्या. यानंतर शतकासमीप पोहोचलेला पसिंदू सूरियाबंदरा देखील बाद झाला. त्याला 92 धावांवर मानव सुथारने बाद केले. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 1 षटकार लगावला. कर्णधार डिकवेला देखील या डावात अपयशी ठरला. त्याने केवळ 23 धावा केल्या. यानंतर सारांश जैनने निरोशन डिक्वेलाची विकेट घेत भारताला सहावे यश मिळवून दिले.

दरम्यान, सामन्याच्या 73 व्या षटकांत पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खेळ थांबवण्यात आला. पाऊस न थांबल्यामुळे चौथ्या दिवसाचा खेळ थांबवावा लागला. चौथ्या दिवसअखेरीस लंकेने 72.4 षटकांत 6 बाद 229 धावा केल्या होत्या. लंकन संघाकडे आता 16 धावांची नाममात्र आघाडी आहे. दिवसअखेरीस दिनुशा 7 तर नुवांता 3 धावांवर खेळत होते. भारताकडून गोलंदाजी करताना मानव सुथारने 2 विकेट्स घेतल्या. प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, जडेजा आणि सारांज जैन आणि प्रत्येकी 1 विकेट घेतली. आता, पाचव्या आणि अखेरच्या दिवशी भारतीय संघ लंकेला लवकर ऑलआऊट करत विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल.

संक्षिप्त धावफलक

भारत पहिला डाव 9 बाद 503 घोषित

श्रीलंका पहिला डाव 89.4 षटकांत सर्वबाद 290 (पासिंदू 80, कमिंदू मेंडिस 32, सोनल दिनुशा 103, नुवांता 18, लहिरु कुमारा 12, प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुथार प्रत्येकी 3 बळी, सारांश जैन 2 बळी)

श्रीलंका दुसरा डाव 72.4 षटकांत 6 बाद 229 (कामिल मिशारा 32, पासिंदू 92, कामिंदू मेंडिस 55, धनजंय डी सिल्वा 23, मानव सुथार 2 बळी, प्रसिद्ध कृष्णा 1, मोहम्मद सिराज, सारांश जैन आणि रविंद्र जडेजा प्रत्येकी 1 बळी)

ऋषभ पंतची रॉकेट स्टंपिंग

टीम इंडियाविरुद्ध दोन्ही डावांत अप्रतिम फलंदाजी करणाऱ्या पसिंदू सूरियाबंदराने पहिल्या डावात 80 तर दुसऱ्या डावात 92 धावांची संयमी खेळी केली. पण, दोन्ही डावांत त्याचे शतक अवघ्या काही धावांनी हुकले. पसिंदू पुढे येऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ओळखताच सुथारने चेंडूचा वेग कमी करत तो ऑफ स्टंपच्या बाहेर फिरवला. सुथारच्या फिरकीला पसिंदूचा अंदाज चुकल्यामुळे तो क्रीझ सोडून पुढे आला. क्षणत, यष्ट्यांच्या मागे उभ्या असलेल्या पंतने कोणतीही चूक न करता यष्ट्या उडवल्या. 92 धावांवर बाद झाल्यानंतर पसिंदू नाराज झालेला दिसला.

Advertisement
Tags :

.