For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टीम इंडिया दिमाखात उपांत्य फेरीत

02:02 AM Mar 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
टीम इंडिया दिमाखात उपांत्य फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

सलामीचा फलंदाज आणि सामनावीर संजू सॅमसने सुरुवातीपासून शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून झळकविलेल्या नाबाद 97 धावांच्या जोरावर भारतीय संघाने आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मोठ्या दिमाखात उपांत्य फेरी गाठली. ईडन गार्डन्स मैदानावर रविवारी झालेल्या सुपर-8 फेरीतील शेवटच्या सामन्यात भारताने विंडीजचा 4 चेंडू बाकी ठेवून 5 गड्यांनी पराभव केला. आता या स्पर्धेत बुधवारी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात तर गुरुवारी भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचे सामने खेळविले जाणार आहेत.

या सामन्यात ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर भारतीय संघाने अलिकडच्या कालावधीत टी-20 प्रकारातील सलग सामने जिंकून विजयी घौडदौड कायम राखली आहे. रविवारी सुटीचा दिवस असल्याने या सामन्याला ईडन गार्डन्सचे मैदान शौकिनांनी खचाखच भरले होते. या दोन्ही संघांचा खेळ शेवटच्या षटकापर्यंत चुरशीचा आणि दर्जेदार झाल्याने अखेर भारताच्या विजयाने शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फिटले.

Advertisement

भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली. विंडीजने 20 षटकात 4 बाद 195 धावा जमविल्या. त्यानंतर भारताने 19.2 षटकात 5 बाद 199 धावा जमवत विजयावर शिक्कामोर्तब केला. संजू सॅमसनने शेवटच्या षटकातील शेफर्डला पहिल्या चेंडूवर षटकार तर दुसऱ्या चेंडूवर विजयी चौकार ठोकला.

विंडीजचा कर्णधार शाय होप आणि चेस या सलामीच्या जोडीने पहिल्या चेंडूपासूनच संघाचा धावफलक हलता ठेवला. अर्शदीप सिंगने आपली पहिली दोन षटके किफायतशीर टाकली. दुसऱ्या बाजूने हार्दिक पंड्याकडे नवा सोपविण्यात आला. पण विंडीजच्या या सलामीच्या जोडीने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 45 धावा जमविल्या. त्यामध्ये होपचा वाटा 25 तर चेसचा वाटा 20 धावांचा होता. या जोडीने 53 चेंडूत 68 धावांची भागिदारी केली. फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने विंडीजची ही जोडी फोडली. स्वीपचा फटका मारण्याचा नादात कर्णधार होप वरुणच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने 33 चेंडूत 1 षटकार आणि तीन चौकारांसह 32 धावा जमविल्या.

बुमराहने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या हेटमायरला सॅमसनकरवी झेलबाद केले. त्याने 12 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 27 धावा जमविताना चेससमवेत दुसऱ्या गड्यासाठी 34 धावांची भर घातली. विंडीजने यानंतर आपला तिसरा गडी पाठोपाठ गमविला. बुमराहच्या गोलंदाजीवर चेस यादवकरवी झेलबाद झाला. त्याने 25 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 40 धावा जमविल्या. पंड्याने रुदरफोर्डला सॅमसनकरवी झेलबाद करवून विंडीजवर अधिकच दडपण आणले. रुदरफोर्डने 1 षटकारासह 14 धावा जमविल्या. विंडीजची स्थिती यावेळी 14.1 षटकात 4 बाद 119 अशी होती.

पॉवेल आणि होल्डर या जोडीने पाचव्या गड्यासाठी 76 धावांची अभेद्य भागिदारी केल्याने विंडीजला 195 धावापर्यंत मजला मारता आली. या जोडीने अर्शदीप सिंगच्या एका षटकात 23 धावा घेतल्या. पॉवेलने 19 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 34 तर होल्डरने 22 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 37 धावा तडकावल्या. विंडीजच्या डावात 10 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. पॉवेल आणि होल्डर याने अर्धशतकी भागिदारी केवळ 20 चेंडूत नोंदविली. भारतातर्फे बुमराहने 36 धावांत 2 तर हार्दिक पंड्या आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

भारताच्या डावाला अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी सावध सुरुवात केली. पण तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर अकिल हुसेनने अभिषेक शर्माला हेटमायरकरवी झेलबाद केले. त्याने 11 चेंडूत 2 चौकारांसह 10 धावा जमविल्या. पहिल्या तीन षटकात भारताने 29 धावा जमविल्या होत्या. होल्डरने भारताला धक्का देताना इशान किशनला हेटमायरकरवी झेलबाद केले. त्याने 6 चेंडूत केवळ 10 धावा जमविल्या. एका बाजूने संजू सॅमसन संघाचा डाव सावरत होता. कर्णधार सूर्यकुमार यादवने सॅमसनसमवेत तिसऱ्या गड्यासाठी 58 धावांची भागिदारी केली. शमार जोसेफच्या गोलंदाजीवर कर्णधार यादव झेलबाद झाला. त्याने 16 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 18 धावा केल्या. भारताची यावेळी स्थिती 10.2 षटकात 3 बाद 99 अशी होती.

संजू सॅमसनला तिलक वर्माने चौथ्या गड्यासाठी बऱ्यापैकी साथ देताना 42 धावांची भागिदारी केली. होल्डरने तिलक वर्माला झेलबाद केले. त्याने 15 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 27 धावा जमविल्या. हार्दिक पंड्याने 14 चेंडूत 2 चौकारांसह 17 धावा जमविल्या. जोसेफने त्याला झेलबाद केले. हार्दिकने सॅमसनसमवेत पाचव्या गड्यासाठी 38 धावांची भागिदारी केली. हार्दिक 19 व्या षटकात बाद झाला तेव्हा भारताला विषयासाठी 17 धावांची गरज होती. संजू सॅमसनला साथ देण्यासाठी डावखुरा शिवम दुबे मैदानात दाखल झाला. दुबेने 4 चेंडूत 2 अप्रतिम चौकार ठोकले. तर त्यानंतर संजू सॅमसनने शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर विजयी चौकार ठोकून विंडीजचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. सॅमसनचे शतक मात्र 3 धावांनी हुकले. पण त्याची 50 चेंडूत 4 षटकात 12 चौकारांसह नाबाद 97 धावांची विजयी खेळी निर्णायक ठरली.

भारताच्या डावामध्ये 6 षटकार आणि 25 चौकार नोंदविले गेले. भारताने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 53 धावा जमविताना दोन गडी गमाविले. सॅमसनने 26 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह अर्धशतक झळकविले. या सामन्याला सुमारे 50 हजार शौकिन उपस्थित होते. मात्र, या सामन्यात भारताच्या तुलनेत क्षेत्ररक्षण अधिक चपळ झाले. भारताकडून विंडीजला किमान पाच जीवदाने मिळाली. या स्पर्धेत भारताला उपांत्य फेरी गाठण्यासाठी रविवारचा सामना जिंकणे जरुरीचे होते. संजू सॅमसनने संस्मरणीय खेळी करत आपल्या संघाला शानदार विजय मिळवून दिला.

धावफलक : विंडीज 20 षटकात 4 बाद 195 (चेस 40, होल्डर नाबाद 37, पॉवेल नाबाद 34, होप 32, हेटमायर 27, रुदरफोर्ड 14, अवांतर 11, बुमराह 2-36, चक्रवर्ती 1-40, पंड्या 1-40)

भारत 19.2 षटकात 5 बाद 199 (संजू सॅमसन नाबाद 97, अभिषेक शर्मा 10, इशान किशन 10, सूर्यकुमार यादव 18, तिलक वर्मा 27, हार्दिक पंड्या 17, दुबे नाबाद 8, अवांतर 12, होल्डर 2-38, जोसेफ 2-42, हुसेन 1-22)

Advertisement
Tags :

.