टीम इंडिया 76 धावांत ऑलआऊट!
तिसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा 125 धावांनी दणदणीत विजय : वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा फेल
वृत्तसंस्था/ नॉटिंगहॅम
ट्रेंट ब्रिज मैदानावर भारतीय संघाला टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 201 धावा केल्या. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ 76 धावांत ऑलआऊट झाला. यजमान संघाने 125 धावांनी विजय मिळवत 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. भारतीय संघाचा टी-20 च्या इतिहासातील धावांच्या दृष्टीने हा सर्वात मोठा पराभव ठरला.
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला जोस बटलर आणि फिल सॉल्ट यांनी दमदार सुरुवात करुन दिली. सॉल्टने 70 धावांचे योगदान दिले तर बटलर 36 धावा करुन बाद झाला. ही जोडी बाद झाल्यानंतर हॅरी ब्रूक (16) आणि जेकब बेथेल (13) स्वस्तात बाद झाले. बॅन्टनला भोपळाही फोडता आला नाही. सॅम करनने 24 चेंडूत 41 धावा केल्या. तर विल जॅक्सने दोन षटकार मारत 14 धावा केल्या आणि संघाला 201 धावांपर्यंत मजल मारुन दिली.
इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 201 धावांचा पाठलाग करताना भारताने पॉवरप्ले मधेच नांगी टाकली. अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशीकडून फार अपेक्षा होत्या. मात्र दोघेही फेल गेले. अभिषेक शर्मा 10 आणि वैभव सूर्यवंशी 13 धावा करून बाद झाले. इशान किशन 13, श्रेयस अय्यर 5, अक्षर पटेल 10, तिलक वर्मा 3, हर्षित राणा 9, शिवम दुबे 2, अर्शदीप सिंग 4, वरुण चक्रवर्ती 5 धावा करून बाद झाले. भारताचा संपूर्ण संघ अवघ्या 76 धावांवर बाद झाला.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड 20 षटकांत 7 बाद 201 (फिल सॉल्ट 70, बटलर 36, ब्रूक 16, सॅम करन नाबाद 41, विल जॅक्स 14, हर्षित राणा आणि प्रिन्स यादव प्रत्येकी 2 बळी).
भारत 11.4 षटकांत सर्वबाद 76 (अभिषेक शर्मा 10, वैभव 13, अक्षर पटेल 10, इशान किशन 13, जोश टंग 4 बळी, जोफ्रा आर्चर 3 बळी).
टीम इंडियाची दुसरी निचांकी धावसंख्या
भारतीय संघ त्यांच्या दुसऱ्या सर्वात कमी धावसंख्येवर सर्वबाद झाला. भारतीय संघ 76 धावांवर सर्वबाद झाला. टी-20 मध्ये भारताची ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. संघाची टी-20 मधील सर्वात कमी धावसंख्या 74 धावा आहे. ही धावसंख्या त्यांनी 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नमध्ये केली होती.