युरोप संघाकडे लेव्हर टेनिस चषक
वृत्तसंस्था,लंडन
येथे झालेल्या लेव्हर चषक सांघिक टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अॅलेक्झांडर व्हेरेवने दर्जेदार कामगिरी करत युरोप संघाला लेव्हर टेनिस चषक मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
2026 च्या टेनिस हंगामामध्ये व्हेरेवची कामगिरी निश्चितच दर्जेदार झाली आहे. त्याने यावर्षी फ्रेंच आणि त्यानंतर अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या. लेव्हर चषक सांघिक टेनिस स्पर्धेतील अंतिम लढतीत युरोप संघाचे प्रतिनिधीत्व करताना व्हेरेवने लर्नर तियानचा 7-6 (7-3), 6-3 असा पराभव केला. या कामगिरीमुळे युरोप संघाने ही स्पर्धा 13-5 अशा फरकाने जिंकली. व्हेरेवने या स्पर्धेच्या इतिहासामध्ये युरोपचे प्रतिनिधित्व करताना आतापर्यंत एकेरीचे सर्वाधिक 8 सामने जिंकले आहेत. गेल्या वर्षी विश्व संघाने सॅन फ्रान्सिस्को येथे ही स्पर्धा जिंकली होती.
युरोप संघाकडून खेळताना कोबोली आणि मेन्सीक या जोडीने अॅलेक्स डी मिनॉर व टेलर फ्रित्झ यांचा दुहेरीमध्ये 7-5, 6-3 असा पराभव केला. कोबोलीने पहिल्यांदाच या सांघिक स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला आहे. व्हेरेवने तियानचा एकेरीच्या सामन्यात पराभव करून जेतेपदावर आपल्या संघाचा शिक्कामोर्तब केला. या लढतीतील अद्याप तीन सामने खेळावयाचे बाकी असताना युरोप संघाने जेतेपद मिळविले आहे. या स्पर्धेत सर्वप्रथम 13 गुण मिळविणारा संघ विजेता म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार युरोप संघाने या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले आहे.