द.आशियाई ट्रायथ्लॉन स्पर्धेसाठी संघ जाहीर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नेपाळमधील पोखरा येथे होणारी आशिया ट्रायथ्लॉन चषक स्पर्धा आणि याचबरोबर होणाऱ्या दक्षिण आशियाई ट्रायथ्लॉन चॅम्पियनशिपसाठी अनुभवी आदर्श मुरलीधरन सिनिमोल व प्रज्ञा मोहन हे भारताचे प्रमुख आव्हानवीर असतील. 27 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारताने 33 मजबूत खेळाडूंचे पथक निवडले आहे.
प्रज्ञाने मागील वेळी तिसऱ्यांदा दक्षिण आशियाई स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. याशिवाय महिलांच्या एकंदर विभागात तिने नववे स्थान मिळवले होते. संजना जोशी व मानसी मोहिते या महाराष्ट्राच्या दुकलीला 13 सदस्यीय महिला संघात स्थान मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या स्पर्धेत प्रज्ञाने सुवर्ण तर संजना व मानसी यांनी रौप्य व कांस्यपदक पटकावले होते. सेनादलाच्या मुरलीधरन सिनिमोलने गेल्या वर्षी तिसरे स्थान मिळविले होते तर 2022 मध्ये त्याने जेतेपद पटकावले होते. पुरुष विभागात निवडण्यात आलेल्या 20 सदस्यीय पथकात मणिपूरच्या तेलहीबा सोरम व क्षेत्रिमयुम कबिदास सिंग यांना स्थान मिळाले आहे. सदर ट्रायथ्लॉन स्पर्धा स्प्रिंट रेस असून त्यात 750 मी. पोहणे, 20 किमी सायकलिंग व 5 किमी धावणे या प्रकारांचा समावेश आहे.
दक्षिण आशियाई ट्रायथ्लॉन चॅम्पियनशिपसाठी निवडलेला संघ : पुरुष-तेलहीमा सोरम, क्षेत्रिमयुम कबिदास सिंग, तुषार डेका, अनघ वानखेडे, पार्थ सांखला, अंगद इंगळेकर, अभिषेक मोदनवाल, अंकुर चहर, पार्थ मिरागे, कृषिव पटेल, कौशिक विनायक मालंडकर, साई रोहिताक्ष केडी, देव अंबोरकर, राज कुमार पवार, पुष्कर दास, विश्वनाथ यादव, आदर्श मुरलीधरन नायर सिनिमोल, अंकन भट्टाचारजी अर्नब भट्टाचार्य, सफा मुस्तफा शेख. महिला : दुर्विशा पवार, डॉली देविदास पाटील, धृती कौलजलगी, रमा सोनकर, हेनी झालावदिया, प्रेरणा श्रवण कुमार, रिद्धी कदम, संजना जोशी, मानसी मोहिते, नफिसा मिलवाला, प्रज्ञा मोहन, पूनम बिस्वास.