एआयच्या जगात शिक्षकांनी जिद्द आणि चिकाटी कायम ठेवा : ॲड.संतोष सावंत
साळगाव जयहिंद महाविद्यालयात नवोदित छात्र शिक्षकांचा स्वागत सोहळा
सावंतवाडी । प्रतिनिधी
बदलत्या समाज व्यवस्थेमध्ये एआयने कब्जा केला आहे. परदेशात तंत्रज्ञानयुक्त शिक्षण प्रणालीने जग व्यापून टाकले असून अशा स्थितीत शिक्षक कालबाह्य होईल का अशी भीती व्यक्त होत असताना आपल्याला शिक्षक व्हायचं आहे ही जिद्द आणि चिकाटी कायम ठेवा. विद्यार्थ्यांना चौफेर ज्ञान देणाऱ्या गुणवंत शिक्षकाचा शोध घेतला जात आहे. त्या शोधात मी असेन का याचा विचार करा आणि त्या ध्येयापर्यंत तुमचा प्रवास चालूच ठेवा. आपोआपच विद्यार्थ्यांच्या मनात घर करणारे शिक्षक अशी तुमची ओळख निर्माण होईल. त्यामुळे कितीही तंत्रज्ञान विकसित झालं तरी शिक्षकाचं नातं हे अतूट राहील.तुम्ही बिनधास्तपणे तुमचं मार्गक्रमण करा असे मत प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना तरुण भारत संवादचे सावंतवाडी प्रतिनिधी तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव,ॲड संतोष सावंत यांनी व्यक्त केले. साळगाव येथील जय हिंद ग्रामोन्नती संस्था संचलित प्रमोद रवींद्र धुरी अध्यापक महाविद्यालया मधील नवोदित छात्र शिक्षकांचा स्वागत सोहळा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी ते बोलत होते .या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन आणि उदघाटन ॲड संतोष सावंत व लोकमान्य ट्रस्टचे कोकण विभागीय एक्झिक्यूटिव्ह प्रवीण प्रभू केळुसकर यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . मयूर बिद्रे ,जय हिंद कॉलेज ऑफ सायन्सचे प्राचार्य अमेय महाजन आधी उपस्थित होते.अध्यक्ष स्थानावरून लोकमान्य एज्युकेशन ट्रस्टचे एक्झिक्यूटिव्ह श्री केळुस्कर म्हणाले या संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून येथील गोरगरीब सर्वसामान्य विद्यार्थ्यांना श्रीमंत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. श्रीमंतांची मुले कुठेही प्रवेश घेऊ शकतात. पण या महाविद्यालयात सर्वसामान्य गोरगरिबांना प्रथम स्थान आणि त्यांना मदतीचा हात दिला जात आहे. हीच खरी ठेव आहे. शिक्षक हा शिल्पकार असतो आणि तुम्ही समाजाचे खरे शिल्पकार आहात. या महाविद्यालयात तुम्हाला दोन वर्षा सर्वकाही शिकता येणार आहे आणि त्याचा वापर तुम्ही सर्टिफिकेट धारक शिक्षक झाल्यानंतर समाजात करता येणार आहे. तुम्ही सातत्याने आदर्श समाज असा घडेल या दृष्टीने तुम्ही विचार करायला हवा. हे महाविद्यालय म्हणजे तुमचं हक्काचं घर आहे असं ते म्हणाले. यावेळी प्राचार्य डॉ शार विद्रे यांनी नव्या छात्र शिक्षकांचे कर्तृत्व शीलवान असले पाहिजे असे आवाहन केले. यावेळी श्रुती वेतुरेकर व सुमिता देसाई यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा अवधूत यजरे यांनी तर आभार प्रा अजित मसुरकर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.ऋषिकेश जाधव ,प्रा दिपाली गाड ,प्रा मनोज सरंबळकर यांनी सहकार्य केले.