शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये स्वसंवेदना विकसित करावी
शिक्षणतज्ञ अभय भंडारी यांनी व्यक्त केले विचार : एसकेई सोसायटीचा स्थापना दिन उत्साहात
बेळगाव : भारतीय ज्ञान परंपरांचे अधिष्ठान हे संवेदनांचे, जाणीवांचे, जिज्ञासेचे आदानप्रदान आहे. शिक्षण व्यवस्था ही विवेकावर आधारित हवी आणि ज्ञानाची कोणतीही अवस्था अंतिम न मानता शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये स्वसंवेदना विकसित करायला हवी, असे विचार शिक्षणतज्ञ अभय भंडारी यांनी व्यक्त केले. येथील एसकेई सोसायटीचा स्थापना दिन बुधवारी साजरा करण्यात आला. यानिमित्त संस्थेच्या के. एम. गिरी सभागृहात अभय भंडारी यांचे ‘शिक्षण : काल, आज आणि उद्या’ या विषयावर व्याख्यान झाले. व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर, अध्यक्ष व्ही. एल. आजगावकर, सचिव लता कित्तूर उपस्थित होते.
अभय भंडारी म्हणाले, आजचा विद्यार्थी हा पराभूत मानसिकतेमध्ये, नैराश्यामध्ये आहे. त्याच्या मन:स्थितीतील ही दुर्बलता झटकून ‘यत्र धर्म तत्र जय:’ हे सूत्र आपल्याला रुजविले पाहिजे. शिक्षण क्षेत्रात ज्ञान ग्रहण करण्याची प्रक्रिया ही विद्यार्थी आणि शिक्षक अशा दोघांच्याही समन्वयाने एकत्रित चालायला हवी. आपण विद्यार्थ्याला ‘गिनीपिग’ न करता त्याला योग्य ज्ञान देऊन तुला जे योग्य वाटते ते तू कर, असे सांगून त्याची स्वसंवेदना विकसित करायला हवी.
आपल्या शिक्षण पद्धतीवर पाश्चात्यांचा प्रभाव आहे आणि भारतीय लोक नीतिमान झाले तर आपल्याला राज्य करता येणार नाही, याची ब्रिटिशांना कल्पना होती. भारतीय समाजमनाचा विवेक ब्रिटिशांना कधी कळलाच नाही आणि त्या विवेकानेच आपल्याला संस्कार दिला आहे. आज जिज्ञासा जागृत करणारे शिक्षण आपण द्यायला हवे. ज्ञानासारखे पवित्र काहीही नाही आणि मन एकाग्र केल्याशिवाय ज्ञानाच्या प्रांतात प्रवेशच नाही. उत्क्रांत होण्याचा प्रवास त्रासाचा, कष्टाचा असतो. त्यासाठी खूप शक्ती लागते. ती विकसित करणे हे शिक्षकांचे काम आहे.
आज शिक्षण पद्धतीमध्येसुद्धा भौतिकवाद शिरला आहे. या भौतिक बाजारपेठेचा चेहरा हिंस्त्र आहे. नीतिमत्तेचा अर्थव्यवस्थेशीही संबंध असतो. आपल्याला या विषवल्ली वेळीच ठेचायला हव्यात आणि शिक्षणाने चारित्र्य निर्माण करायला हवे. सतत इतरांच्या करुणेची कामना करणाऱ्या माणसाचे मन तणावमुक्त असते. शिक्षकांनी चारित्र्य निर्माण करणारे शिक्षण दिल्यास नजीकच्या क्षेत्रातला भारत वेगळा असेल. विश्वातील प्रत्येकाचे कल्याण करण्याचा विचार प्रत्येक विद्यार्थी करेल आणि तो महागुरु होईल. जे उपयुक्त नाही त्याचा निचरा करणे आणि इतरांशी दायित्वाच्या भावनेने बांधले जाणे, ही भावना शिक्षकांनी रुजवायला हवी, असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोप करताना डॉ. किरण ठाकुर यांनी जीवन कौशल्य शिकविणारे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. केवळ पुस्तकी शिक्षण नको, तर ज्ञान देण्याची प्रक्रिया निरंतर सुरू राहायला हवी. तरच आपण विश्वगुरु उभे करू शकतो, असे सांगितले. प्रारंभी अक्षय हिरेमठ यांनी दक्षिणामूर्ती स्तोत्र म्हटले. त्यानंतर संस्थापकांना पुष्पांजली वाहण्यात आली. आरपीडीचे प्राचार्य डॉ. अभय पाटील यांनी स्वागत केले. लता कित्तूर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. डॉ. शर्मिला संभाजी यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. यावेळी डॉ. किरण ठाकुर यांच्या हस्ते नचिकेत भंडारी यांचाही सत्कार करण्यात आला. डॉ. किरण ठाकुर, प्राचार्य एस. एन. देसाई, प्राचार्य अभय सामंत व प्राचार्या तृप्ती शिंदे यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. साईशिला जडे यांनी आभार मानले.