`शिक्षक-पदवीधर`चा मुंबईतील मोर्चाला अडथळा? शिक्षकांतून संतापाची तीव्र लाट; मोर्चाची धार कमी करण्याचा प्रयत्न
सुभाष पाटील
कूर: राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या मुंबईतील आझाद मैदानावरील बेमुदत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. आचारसंहितेच्या आडून शासन निर्णय लांबवला जाणार का? की मोर्चाची धार कमी करण्यासाठीच निवडणूक जाहीर करण्यात आली? अशी शंका शिक्षकांमध्ये व्यक्त होत असून संतापाची लाट उसळली आहे.
महाराष्ट्र राज्य समन्वय संघाच्या झेंड्याखाली विविध संघटना एकत्र येत दि. २८ सप्टेंबरपासून आझाद मैदान, मुंबई येथे जुनी पेन्शन योजनेसाठी बेमुदत धरणे आंदोलन छेडणार आहेत. दि. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तत्काळ जुनी पेन्शन लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन उभारले जात आहे. आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्यासाठी इच्छामरणाच्या परवानगीसंदर्भात मुख्यमंत्री यांना मेल पाठविणे, तसेच आमदार-खासदारांचे समर्थन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिक्षक व पदवीधर मतदारसंघांच्या पाच जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून २३ ऑक्टोबर रोजी मतदान आणि २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे. त्यामुळे शासनाकडून कोणताही महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेण्यावर मर्यादा येतात, हे वास्तव आहे.
याच मुद्द्यावरून शिक्षकांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे. आचारसंहितेमुळे शासन जुनी पेन्शनबाबत निर्णय घेऊ शकणार नाही, मग आंदोलनाचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही शिक्षकांनी तर मोर्चा कमकुवत करण्यासाठीच हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला काय? अशीही शंका व्यक्त केली आहे. राज्यातील औरंगाबाद, पुणे, नागपूर, अमरावती व पुणे शिक्षक अशा पाच मतदारसंघांसाठी ही निवडणूक होत असून दि. ६ ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ दि. ६ डिसेंबर २०२६ रोजी संपत आहे.