गणतीसह उत्तरपत्रिका तपासणीची शिक्षकांवर दुहेरी जबाबदारी
शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराबाबत नाराजी
बेळगाव : शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे शिक्षकांवर एकाच दिवशी दहावीची पेपर तपासणी व गणतीसाठीचे ट्रेनिंग अशी दुहेरी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांना एकतर गणतीचे ट्रेनिंग अथवा पेपर तपासणीला उपस्थित रहावे लागणार आहे. त्यातच पहिली ते नववी पर्यंतच्या परीक्षा झाल्याने त्यांचीही पेपर तपासणी करावी लागत असल्याने शिक्षकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
गणतीसाठी महानगर पालिकेच्यावतीने आठ ते दहा एप्रिल दरम्यान शर्मन स्कूल येथे ट्रेनिंग ठेवण्यात आले आहे. तर बुधवार दि. 8 रोजी दहावीच्या उत्तर पत्रिका तपासणीला सुरुवात होणार आहे. एकूण आठ केंद्रांवर विषयानुरुप उत्तर पत्रिकांची तपासणी केली जाणार आहे. सध्या प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील परीक्षा संपल्याने सरकारच्या नियमावलीनुसार शुक्रवार दि. 10 रोजी निकाल देणे आवश्यक आहे. त्यापूर्वी सर्व निकाल तयार करावा लागत आहे.
एकाच वेळी सर्व जबाबदाऱ्या पेलाव्या लागत असल्याने शिक्षक वैतागले आहेत. एक तर गणती अथवा पेपर तपासणीची जबाबदारी द्यावी, अशी मागणी केली जात आहे. सध्या शिक्षकांकडून पहिली ते नववी पर्यंतचा निकाल रात्रंदिवस पूर्ण केला जात आहे. उत्तर पत्रिका तपासून त्याचे गुण उत्तर पत्रिकेवर शिक्षकांना द्यावे लागत आहेत. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी असून शिक्षण विभागाने या संदर्भात विचार करावा, अशी मागणी केली जात आहे.
आजपासून दहावीची उत्तरपत्रिका तपासणी
गुरुवार दि. 2 रोजी दहावीच्या परीक्षा संपल्या. त्यानंतर चार दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवार दि. 8 पासून उत्तर पत्रिका तपासणीला सुरुवात होणार आहे. शहरातील आठ केंद्रांवर उत्तर पत्रिका तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. तसेच सीसीटीव्हीची नजर राहणार आहे.