For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिक्षक दिन : आयुष्याला दिशा देणारा दीपस्तंभ.!

05:06 AM Sep 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
शिक्षक दिन   आयुष्याला दिशा देणारा दीपस्तंभ
Advertisement

आपल्या देशात दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताचे पूर्व राष्ट्रपती, एक विद्वान शिक्षक आणि प्रसिद्ध तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. त्यांनी शिक्षण आणि ज्ञानाच्या प्रसारासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. हा दिवस आपल्या समाजाचा आधारस्तंभ असलेल्या शिक्षकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो.

Advertisement

शिक्षक हे आपल्या जीवनात मोठी भूमिका बजावतात. ते आपल्याला ज्ञान, कौशल्ये आणि जीवनाचे मौल्यवान धडे शिकवतात. शिक्षक हे फक्त ज्ञान देत नाहीत, तर ते आपल्याला आत्मविश्वास, ध्येय आणि आशावादही देतात. ते आपल्याला चांगले नागरिक बनण्यासाठी मार्गदर्शन करतात. शिक्षकांच्या प्रेरणेने आपल्याला आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास प्रोत्साहित केले जाते. शिक्षक हे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असते आणि म्हणूनच आपल्या शिक्षकांची शिकवण आयुष्यभर आपल्यासोबत राहते. त्यांच्या मार्गदर्शनाने, आपण यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करत असतो. शिक्षक आपल्याला समस्यांना तोंड देण्यास आणि आत्मविश्वास निर्माण करण्यास मदत करतात. त्यांच्या ज्ञानाचा आणि मार्गदर्शनाचा आपल्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो. एक शिक्षक आपल्याला एक चांगली व्यक्ती बनण्याची प्रेरणा देतो. आपल्या विद्यार्थ्यांना भविष्यासाठी ते तयार करतात. शिक्षकांचे आपल्या देशाच्या विकासात मोलाचे योगदान आहे. आपल्या संस्कृतीत प्राचीन काळापासून गुरू-शिष्य परंपरा अस्तित्वात आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या शिक्षकांना खूप महत्त्वाचे स्थान असते. समाज, राष्ट्र उभारणीच्या कामात शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. आपल्या देशाला अशी भूमिका निभावणारे अनेक शिक्षक लाभले आहेत. पण ज्यांनी आपले तन, मन, धन, आपले उभे आयुष्यच शिक्षणाला वाहून घेतले असे एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन! भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 साली तामिळनाडूमधील तिरुत्तनी गावी झाला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे लहानपणासूनच खूप अभ्यासू होते. शाळेत नेहमीच ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत असत. आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मद्रास येथील प्रेसिडेन्सी कॉलेजात तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून शिक्षकीपेशाने जीवनाची सुरुवात केली. त्यांचे शिकवणेही अतीशय उच्च दर्जाचे होते. त्यांनी तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून जगभर नावलौकिक मिळवला. त्यानंतर त्यांनी ऑक्सफोर्ड, म्हैसूर यांसारख्या नावाजलेल्या विद्यापीठात अध्यापन केले. भारतासह जगभरातील सर्व शिक्षक तत्वज्ञांचे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे आदर्श स्फूर्तिस्थान आहेत. हिंदू संस्कृतीचा महिमा सांगणारा त्यांचा ‘इंडियन फिलॉसॉफी’ हा ग्रंथ एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. त्यांनी तरुणांना ‘जागृत व्हा, उठा’ असा संदेश दिला. त्यांच्या याच अतुलनीय कार्यामुळे त्यांना डॉक्टरेट, डी.लिट., भारत रत्न यांसारखे सर्वोच्च पुरस्कार मिळाले.

आपल्या भारतीय संस्कृतीत शिक्षकाला “गुरु” म्हणून फार मोठं स्थान आहे. जुन्या श्लोकात सांगितलं आहे “गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा.” म्हणजे गुरु म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश. आपल्या आयुष्यातील ज्ञानाचा दिवा पेटवणारे हेच शिक्षक असतात. आजच्या आधुनिक काळात जरी संगणक, मोबाईल, इंटरनेटने शिक्षणाची पद्धत बदलली असली, तरी शिक्षकाची जागा कुणीच घेऊ शकत नाही. कारण माणसाला फक्त ज्ञान नाही, तर मूल्य, संस्कार आणि विचार देणं हे शिक्षकच करतात. आजच्या मुलांनी आणि तरुणांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी  आपण जे काही होतो ते फक्त आपल्यामुळे नाही, तर आपल्यामागे उभे राहून दिवसरात्र परिश्रम घेणाऱ्या शिक्षकांमुळे आहे. डॉक्टर, इंजिनिअर, पोलीस, शेतकरी, कलाकार कुणीही व्हा; त्यामागे कुणाच्या ना कुणाच्या शिकवणीचा ठसा असतोच. आपल्याला माहीत आहे, जगातील मोठमोठ्या व्यक्तींनी नेहमी आपल्या शिक्षकांचं नाव घेतलंय. शिक्षक म्हणजे केवळ पुस्तकातील अक्षरं शिकवणारा नाही तर जीवन कसं जगायचं, अडचणींवर मात कशी करायची, अपयशाला कसं सामोरं जायचं हे शिकवणारा एक मार्गदर्शक आहे.

Advertisement

प्रा. डॉ. गिरीश नाईक

Advertisement
Tags :

.