शिक्षकांच्या बदल्या-जनगणनेतून निघाला तोडगा
जिल्हाधिकाऱ्यांची मध्यस्थी : शिक्षक संघटनांचे समाधान
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्या-पदोन्नती आणि जनगणनेच्या कामावरून निर्माण झालेला गोंधळ अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने सुटला आहे. गणतीमुळे बदलीच्या जागी रुजू होण्यासाठी थांबविण्यात आल्याने शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र जिल्हा प्रशासनाने यावर सकारात्मक तोडगा काढला आहे. कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघ, माध्यमिक शाळा शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. गणतीच्या कामाचे नियोजन करून शिक्षकांच्या बदल्या व पदोन्नती याबाबतचे अडथळे दूर करण्याची मागणी करण्यात आली होती. बदली व पदोन्नती मिळविलेल्या शिक्षकांना 9 एप्रिल पासून कार्य मुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु जनगणनेच्या कामामध्ये गैरसोय होऊ नये, म्हणून सदर शिक्षकांना 16 मेनंतर कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले.
बदली व पदोन्नती मिळविलेल्या शिक्षकांना जनगणनेचे काम देण्यात आलेले नाही. यापैकी अनेक शिक्षक सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. जर त्या शाळांमध्ये उपस्थित राहिले नाहीत तर सेवाज्येष्ठता व आर्थिक लाभांपासून त्यांना दूर रहावे लागणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करावे, अशी मागणी संघटनेने केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तोडगा काढला आहे. बदली झालेल्या शिक्षकांनी नव्या जागी नियुक्त होऊन जनगणनेची प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण करावी, असे निर्देष जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयकुमार हेब्बळ्ळी यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष गजानन सोगलन्नावर, रमेश, राचण्णावर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.