शिरोडा येथे शिक्षिकेचा खून
पतीनेच पत्नीला दगडाने ठेचले : पती-पत्नीच्या कृत्याने 2 वर्षीय मुलगा झाला पोरका
प्रतिनिधी/ फोंडा
शिरा- शिरोडा येथे पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यावर दगडी चिरा घालून निर्घृण खून केल्याचा प्रकार काल शनिवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आला. हेमा चेतन गावकर (31 रा. शिरा-शिरोडा) असे मयत पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी पती चेतन रत्नाकर गावकर (34, मूळ तळपण-शिरोडा) याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवून उशिरा रात्री अटक केली आहे. पती-पत्नीच्या कृत्यात सध्या त्यांचा दोन वर्षाचा मुलगा पोरका झाला आहे.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती-पत्नी नोकरी करतात. लग्नानंतर सुरुवातीला वर्षभर चांगली संसारात रमली. त्यांच्या संसाराच्या वेलीवर एका चिमुकल्याचे आगमन झाले. मुलाच्या आगमनाने घरामध्येही उत्साही वातावरण होते. त्यानंतर वर्षभरात दोघाही पती-पत्नीचे खटके उडू लागले. अधून-मधून प्रकरण हातघाईवर जात असे. त्यामुळे मयत हेमा ही आपल्या माहेरी तळयेवाडा-बेतोडा येथे काही दिवस राहत असे. तसेच याच कारणामुळे चेतन याने आपल्या आई-वडिलांच्या मूळ घरापासून सुमारे दीड किलोमिटर अंतरावर एक घर बांधले होते. तिथेच तो आपल्या पत्नी व मुलासमवेत राहत असे. तरीही पती-पत्नीमध्ये खटके उडण्याचे प्रकार सुरूच होते. काल शनिवारी दुपारी कडाक्याचे भांडण झाले. त्यात रागाच्या भरात चेतनने पत्नीच्या डोक्यावर दगड घालून तिला ठेचले. हॉलमध्येच ती पडली होती. पतीने नेमका खून कशासाठी केला याचे कारण अजून गुलदस्त्यात आहे.
पतीबरोबर खटके उडाल्यानंतर माहेरी परतायची
हेमा ही पूर्वाश्रमीची तळेवाडा-बेतोडा येथील आहे. तिला तळपण-शिरोडा येथे लग्न करून दिले होते. संशयित चेतन हाही आई-वडिलांचा एकुलता मुलगा असून त्याला दोन विवाहित बहिणी आहेत. फर्मागुडी येथील एका शैक्षणिक संस्थेत मयत हेमा विद्यादान करीत होती तर तिचा पती चेतन हा उपजिल्हाधिकारी कचेरीत कारकून म्हणून कामाला आहे. दोघेही नोकरीला असल्यामुळे नमते घ्यायला तयार नव्हते. पतीने डाव साधून हा खून केला. शिरा-शिरोडा येथे हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडला होता. खून करण्यासाठी वापरलेला दगड फोंडा पोलिसांनी जप्त केला आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावर नमूने गोळा केले आहेत. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगाव येथील जिल्हा इस्पितळात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी निरीक्षक विजयनाथ कवळेकर अधिक तपास करीत आहेत