Kolhapur : टीईटी परीक्षेच्या भीतीने शिक्षकाची आत्महत्या
आंबोली-गेळे येथील शिक्षक आनंद कदम यांची आत्महत्या
आंबोली : आंबोली-गेळे येथील शिक्षक आनंद सुरेश कदम (वय ३६) यांनी राहत्या घरात पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास आंबोली-गेळे कदमवाडी येथे घडली.
या घटनेची खबर त्यांचा मोठा भाऊ सुनील कदम यांनी आंबोली पोलिसात दिली. याची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गवारे यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. त्यांना घटनास्थळी एक चिठ्ठीही मिळाली. त्यात 'आपण टीईटी परीक्षेत पास होणार नाही', असे लिहिले होते. कदम आंबोली-गावठणवाडी जि. प. शाळा नं. ६ येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते.
त्यांचे आई-वडील सकाळी साडेआठच्या गाडीने पुणे येथे जाण्यास निघाले होते. तर पत्नी गडहिंग्लज येथे मुलासोबत राहते. आनंदही तेथेच राहत असत. शुक्रवारी सकाळी आनंदचे आई आणि वडील पुण्याला निघून गेले. तर मोठा भाऊ सुनील आंबोलीतील एका हॉटेलात कामावर जायला निघाला. आनंद आपल्या पत्नी आणि मुलासह गडहिंग्लज येथे राहत असत.
मुलगा पाचवीत शिकत आहे. शुक्रवारी सकाळी आनंद नेहमीच्या वेळेत शाळेत आले. त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. तेरसे यांच्याकडे शालेय पोषण आहाराचे सर्व रेकॉ र्ड दिले. उरलेले पैसेही जमा केले. आपल्या वडिलांची तब्येत बरी नसल्याने आठ दिवसांसाठी रजेचा अर्ज ठेवला. दुपारी अर्धा दिवस काम करून ते घरी निघून गेले.
प्राथमिक माहितीनुसार, दुपारी शाळेतून घरी गेल्यावर आनंद आपल्या खोलीवर गेले. त्यांनी घरातील पंख्याला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. सकाळी येताना गडहिंग्लज येथून येणाऱ्या सहकारी शिक्षकांना त्यांनी सांगितले की, माझा कॉल नाही लागला तर माझी वाट पाहू नका. तुम्ही पाच वाजता निघून जा.सायंकाळी आनंद यांचा मोठा भाऊ सुनील कामावरून आला, तेव्हा त्यांच्या मोबाईलची रिंग वाजत होती.
त्यामुळे त्याने रुमचा दरवाजा ठोठावला. परंतु आतून प्रतिसाद न मिळाल्याने त्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता आनंद गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यानंतर याची माहिती पत्नी व पोलिसांना दिली.
हवालदार संतोष गलोले, लक्ष्मण काळे यांनी पंचनामा केला. आणि मृतदेह विच्छेदनासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला. शवविच्छेदन करून मृतदेह भाऊ सुनील याच्या ताब्यात दिला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.