विश्वासघात करणाऱ्यांना लोकशाही मार्गाने धडा शिकवा!
खेर्डीतील महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत आमदार भास्कर जाधवांचे आवाहन; प्रशांत यादवांना विजयी करण्याचा निर्धार
खेर्डी :
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले पाहिजे. त्यासाठी विश्वासघात करणाऱ्यांना लोकशाही मार्गाने धडा शिकवला पाहिजे. ज्यांना तुम्ही निवडून दिलेत ते निघून गेले. आता तुम्हाला हिम्मत, ताकद, कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी आली आहे. तुम्ही निवडून गेलात आमच्यामुळे, तुम्हाला पाडण्याची हिम्मत, ताकद आमच्या मनगटात आहे हे दाखवण्याची वेळ आली, ते तुम्ही करून दाखवताना प्रशांत यादव यांना विजयी करा, असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांनी खेर्डी येथील प्रचारसभेत केले.
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारार्थ खेर्डी रेल्वे पुलाजवळ मंगळवारी रात्री आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शिवसेना फुटीत १३ खासदार, ४० आमदार निघून गेले. मात्र हे सर्व निघून गेले तरी माझ्यासोबत निवडून देणारे आहेत, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. त्याचाच अनुभव चिपळूण, रत्नागिरी, खेड मतदारसंघात आहे. यामुळे तुम्हाला आता ठरवायचं आहे, निर्णय घ्यायचा आहे. ज्यांना तुम्ही निवडून दिलेत ते निघून गेले. आता तुम्हाला हिम्मत, ताकद, कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी आली आहे, असेही ते म्हणाले.