चहाची निर्यात 11.63 कोटी किलोपर्यंत वधारली
जानेवारी ते जुलै दरम्यानची आकडेवारी
वृत्तसंस्था /कोलकाता
वर्ष 2022 मध्ये जानेवारी ते जुलै या कालावधीत चहाची निर्यात 11.63 कोटी किलोग्रॅमपर्यंत वाढली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ती 10.33 कोटी किलो इतकी होती. टी संचालक मंडळाच्या आकडेवारीनुसार, सर्वात मोठय़ा आयातदार कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडंट नेशन्स (सीआयएस) ची निर्यात जानेवारी-जुलै या कालावधीत सुमारे 2.52 कोटी किलो इतकी राहिली, जी मागील वर्षी याच कालावधीत 2.49 कोटी किलो होती. चहा उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्यात समान पातळीवर राहिली आणि रशिया-युक्रेनमधील संघर्षामुळे निर्यात शिपमेंटवर परिणाम झाला.
रशिया सीआयएस ब्लॉकमध्ये एक प्रमुख आयातदार आहे. चालू सात महिन्यांत 1.85 कोटी किलो चहाची निर्यात झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत 1.91 कोटी किलो चहाची निर्यात झाली होती. चहा बोर्डाच्या सूत्रांनी सांगितले की, कंटेनर संकट आणि समुद्रातील मालवाहतूक वाढल्याने रशियाला होणारी निर्यात प्रभावित झाली आहे.
रशियानंतर, संयुक्त अरब अमिराती हा प्रमुख आयातदार म्हणून उदयास आला आहे, ज्याने पहिल्या सात महिन्यांत 1.91 कोटी किलोग्रॅम चहाची आयात केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 80.7 लाख किलो चहा आयात केली होती. इराणची निर्यातही पहिल्या 7 महिन्यात सुमारे 1.39 कोटी किलोग्रॅमवर पोहोचली, जी मागील वर्षी याच कालावधीत 1 कोटी 30 लाख किलोग्रॅम होती. टी बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पेमेंटच्या समस्येमुळे इराणच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. संकटग्रस्त श्रीलंकेतील निर्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत दुप्पट होऊन 16.5 लाख किलोग्रॅम झाली असल्याची नोंद करण्यात आली आहे.