टीसीएसकडून 25 हजार जणांची भरती
आर्थिक वर्ष 2027 मधील कामगिरी : फ्रेशर्सचा समावेश
त. भा. वृत्तसंस्था
मुंबई : आयटी क्षेत्रातील आघाडीवरची कंपनी टीसीएस यांनी आर्थिक वर्ष 2027 मध्ये 25 हजार जणांना नोकरी देऊ केली आहे. आगामी काळामध्येसुद्धा नव्या उमेदवारांची भरती करण्याची योजना सुरुच ठेवणार असल्याचे सुतोवाच कंपनीकडून करण्यात आले आहे.
आर्थिक वर्ष 2027 मध्ये एकंदर 25 हजार प्रेशर्सची भरती करण्यात आली असून आगामी काळातही नव्या उमेदवारांची भरती टप्पाटप्प्याने केली जाणार असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक के. क्रितीवासन यांनी म्हटले आहे. आर्थिक वर्ष 2026 मध्ये पाहता कंपनीने 44 हजार फ्रेशर्सची भरती केली होती. सदरच्या वर्षामधील भारतामध्ये करण्यात आलेली कंपनीची ही सर्वात मोठी उमेदवार भरती होती.
येत्या काळात होणार भरती
अनुभवी उमेदवारांऐवजी प्रेशर्सना जास्तीत जास्त संधी देण्यासाठी कंपनीचे प्रयत्न असणार आहेत. अशा प्रेशर्सना एखाद्या प्रकल्पाचे काम सोपविण्याआधी 9 महिने प्रशिक्षीत केले जाते. व्यवसायाच्या मागणीनुसार येत्या काळातही टप्प्याटप्प्याने उमेदवार भरतीचा कार्यक्रम घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.