टीसीएसला 12,224 कोटींचा निव्वळ नफा
मागच्या तुलनेत नफ्यात किरकोळ घसरण : मार्च तिमाहीचा निकाल जाहीर
कोलकाता :
भारतातील दुसऱ्या नंबरची आयटी क्षेत्रातील कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएस यांनी मार्च 2025 अखेरचा तिमाही निकाल जाहीर केला आहे. सदरच्या तिमाहीत कंपनीने निव्वळ नफ्यात एक टक्का घसरण नोंदवली आहे.
आर्थिक वर्ष 2025 च्या चौथ्या तिमाहीमध्ये टीसीएसने 12,224 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी या तिमाहीमध्ये हा नफा 12,434 कोटी रुपये इतका होता. असं जरी असलं तरी टीसीएसच्या महसुलामध्ये मात्र काहीशी वाढ नोंदवली गेली आहे. मार्च अखेरच्या तिमाहीमध्ये कंपनीचा महसूल पाच टक्के वाढत 65,507 कोटी रुपयांचा झाला आहे. मागच्या वर्षी याच अवधीत पाहता टीसीएसने 62,394 कोटी रुपये महसूल मिळवला होता. महसुल किरकोळ वाढलेला असला तरी नफ्यावरती मात्र काहीसा दबाव पाहायला मिळाला आहे.
30 रुपये प्रति समभाग लाभांश
टीसीएसच्या संचालक मंडळाने प्रत्येक समभागावर 30 रुपये अंतिम लाभांश देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. प्रत्येक समभागाची फेस व्हॅल्यू 1 रुपये असणार आहे. हा जो लाभांश आहे तो कंपनीच्या 30 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीनंतर पाचव्या दिवशी गुंतवणूकदारांना दिला जाणार आहे. मात्र लाभांश हा समभागधारकांच्या मंजुरीवर अवलंबून असतो. जरी नफा काहीसा घटलेला असला तरी 30 रुपये प्रति समभाग हा लाभांश गुंतवणूकदारांना निश्चित मिळणार आहे. तेव्हा गुंतवणूकदारांसाठी हे सकारात्मक पाऊल मानले जात आहे.
आर्थिक वर्षातील कामगिरी
आर्थिक वर्ष 2025 मध्ये ऑपरेशनल महसूल 2,55,324 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. इतर उत्पन्न 4422 कोटी रुपयांवर आणि एकूण उत्पन्न 2,45,315 कोटी रुपये नोंदले गेले आहे. करपश्चात नफा हा सदरच्या वर्षात 61,997 कोटी रुपये दिसून आलाय. एकूण निव्वळ नफा हा 46099 कोटे राहिला.