टीसीएस’ सीईओंच्या वेतनात प्रचंड वाढ
वेतन 4.6 टक्क्यांच्या वाढीसह 26.5 कोटींच्या घरात
नवी दिल्ली :
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)चे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक के. कृतिवासन यांचे वार्षिक वेतन 2024-25 या आर्थिक वर्षात 4.6 टक्क्यांनी वाढून 26.5 कोटी झाले आहे. गेल्या वर्षी त्यांचे वेतन 25.35 कोटी होते. सदरची माहिती कंपनीच्या ताज्या वार्षिक अहवालात देण्यात आली आहे.
अहवालानुसार, कृतिवासन यांना मूळ पगार 1.39 कोटी मिळाला. याशिवाय त्यांना भत्ते, सुविधा आणि भत्ते म्हणून 2.12 कोटी मिळाले. सर्वात मोठा वाटा 23 कोटी होता, जो त्यांना कमिशन म्हणून देण्यात आला. त्यांचा पगार सरासरी कर्मचाऱ्यांच्या 329.8 पट आहे. कर्मचाऱ्यांना सरासरी 4.5-7 टक्क्यांची वाढ देखील मिळते.
टीसीएसने सांगितले की कर्मचाऱ्यांना सरासरी 4.5 ते 7 टक्के वेतनवाढ देण्यात आली आहे, तर भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांना 10 टक्क्यांपेक्षा जास्त दुहेरी अंकी वाढ मिळाली आहे. पदोन्नती आणि इतर कारणांसह, एकूण पगारवाढ 5.5 ते 7.5 टक्क्यांपर्यंत होती. भारताबाहेरील कर्मचाऱ्यांना 1.5 ते 6 टक्केपर्यंत वाढ मिळाली.
टीसीएसने म्हटले आहे की, पगारवाढ ही देशातील बाजारातील ट्रेंडवर आधारित आहे. तसेच, कंपनीची कामगिरी, कर्मचाऱ्याची भूमिका आणि त्यांच्या वैयक्तिक कामगिरीवर आधारित वेतन निश्चित केले जाते. मार्च 2025 पर्यंत टीसीएसमध्ये एकूण 6,07,979 कर्मचारी होते. अहवालानुसार, गेल्या आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांच्या सरासरी पगारात 6.3 टक्के वाढ नोंदवण्यात आली.
एआयला मोठ्या गुंतवणुकीची गरज
कृतिवासन म्हणाले की सध्याची भू-राजकीय आणि आर्थिक परिस्थिती खूप आव्हानात्मक आहे. त्यांनी सांगितले की एआयच्या क्षेत्रात जलद बदल होत आहेत. एआयमुळे खूप लक्षणीय बदल अपेक्षीत असून यात गुंतवणूक वाढण्याची गरज आहे.