टीसीएसने पोर्शच्या आयटी कंपनीची केली खरेदी
3.5 हजार कोटी रुपयांमध्ये झाला खरेदी करार : 5 वर्षांची केली भागिदारी
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसने जर्मनीतील पोर्श या आयटी व सल्लागार कंपनीअंतर्गतची फर्म एमएचपीचे अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला आहे. सदरचा खरेदीचा व्यवहार हा 3.5 हजार कोटी रुपयांना झाल्याचे समजते. पुढील पाच वर्षासाठी दोन्ही कंपन्यांनी एकत्रित भागीदारी जाहीर केली आहे. याअंतर्गत पुढील 5 वर्षात टीसीएस पोर्शला एआय, सॉफ्टवेअर संचालीत कार्स व डिजिटल तंत्रज्ञानाशी निगडीत सेवा प्रदान करणार आहे.
करार किती महत्त्वाचा
टीसीएसने पोर्शची कंपनी एमएचपी खरेदी करण्यामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे 13950 कोटी रुपयांचा मोठा प्रकल्प मिळावा हे सांगितले जात आहे. याशिवाय एमएचपी जर्मनी, अमेरिका, ब्रिटन व रोमानिया सारख्या देशांमध्ये कार्यरत आहे. या खरेदीनंतर एमएचपीकडे जेवढे म्हणून ग्राहक आहेत ते थेटपणे टीसीएसकडे वर्ग होणार आहेत. एमएचपी ही सल्ला देणारी कंपनी आहे. यांच्याकडे अशा प्रकारचे गाड्यांचे सॉफ्टवेअर बनवायचा अनुभव आहे जे एआय व कॉम्प्युटर प्रोग्रॅमवर चालते.
कंपनीचा विस्तार जर्मनी, अमेरिकेसोबत, ब्रिटन, रोमानिया, भारत व मेक्सिकोतही असून कंपनीत 4500 जण काम करतात. वर्ष 2025 मध्ये एमएचपीची कमाई जवळपास 8280 कोटी रुपयांची होती.
युरोपमध्ये आयटीत दबाव
सध्याला पाहता युरोपातील बाजारांमध्ये मंदीचा परिणाम पाहायला मिळतो आहे. आयटी क्षेत्राचे काम सुस्त चालले आहे. अशावेळी टीसीएस कंपनीने खरेदीचा मोठा करार केला आहे. यापूर्वी पाहता भारतातल्या एचसीएल टेक्नॉलॉजीने 2023 मध्ये एएसएपी समुहाची 2300 कोटी रुपये व पर्सिस्टंट सिस्टम्सने नगारोची 11820 कोटी रुपये मोजून खरेदी केली होती.
10 महिन्यात 3 खरेदी करार
टीसीएस या आयटी क्षेत्रातील कंपनीने गेल्या 10 महिन्यात पाहता 3 मोठे खरेदी करार केले आहेत.
? जर्मन कंपनी पोर्शची आयटी कंपनी एमएचपी - 3500 कोटी रुपये
? अमेरिकेतील आयटी कंपनी कोस्टल क्लाऊड 5800 कोटी रुपये
? अमेरिकेतील डिजिटल मार्केटिंग कंपनी लिस्टएंगेज 600 कोटी रुपये